विलास देशमुख यांचे मुलीसोबत भर पावसात उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:21 AM2021-07-09T04:21:09+5:302021-07-09T04:21:09+5:30
रत्नागिरी : अधिसंख्य पदाचे आदेश न मिळाल्याने विलास देशमुख यांचे मुलीसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चौथ्या दिवशाही भर पावसात उपोषण सुरूच ...
रत्नागिरी : अधिसंख्य पदाचे आदेश न मिळाल्याने विलास देशमुख यांचे मुलीसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चौथ्या दिवशाही भर पावसात उपोषण सुरूच राहिले.
अधिसंख्य पदाचे आदेश मिळण्यासाठी सेवासमाप्त लिपिक - टंकलेखक विलास देशमुख यांनी ऑर्गनायझेशन फाॅर राईटस ऑफ ह्यूमन (आफ्रोह) यांच्या माध्यमातून बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे. गुरूवारी चौथ्या दिवशीही भर पावसात त्यांचे उपोषण सुरूच होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्या निकिता तसेच देशमुख यांना न्याय मिळावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला ते तुळशीराम केळधने हेही होते.
देशमुख यांचे अधिसंख्य पदाचे आदेश मिळण्यासाठी आफ्रोह संघटनेमार्फत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. २१ डिसेंबर २०१९च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक ४.१ची अमलबजावणी करून जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केले आहे. मग शासन निर्णयातील एका मुद्द्याची अमलबजावणी करताना जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे मार्गदर्शन का मागितले नाही. मात्र, देशमुख यांच्या आदेशाबाबत मार्गदर्शन का मागवले, असा प्रश्न ‘आफ्रोह’कडून विचारला जात आहे. देशमुख यांना अधिसंख्य पदाचे आदेश देण्यास विलंब होत असल्याने ‘आफ्रोह’ने साखळी उपोषण सुरूच ठेवले असून, देशमुख यांना अधिसंख्य पदाचे आदेश मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.