विलास देशमुखांचे कुटुंबीयांसह ५ रोजी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:20 AM2021-07-05T04:20:31+5:302021-07-05T04:20:31+5:30
रत्नागिरी : अधिसंख्य पदाचे आदेश मिळण्यासाठी सेवासमाप्त लिपिक-टंकलेखक विलास देशमुख गेली दीड वर्ष जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. जिल्हाधिकारी ...
रत्नागिरी : अधिसंख्य पदाचे आदेश मिळण्यासाठी सेवासमाप्त लिपिक-टंकलेखक विलास देशमुख गेली दीड वर्ष जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय मात्र शासन निर्णयातील सुस्पष्ट आदेश डावलून येनकेन प्रकारे मार्गदर्शनाच्या नावाखाली अधिसंख्य पदाचे आदेश देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ देशमुख हे त्यांच्या कुटुंबीयांसह आफ्रोह संघटनेसोबत ५ जुलै रोजी साखळी उपोषण करणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी करून न्याय द्यावा, एवढीच माफक अपेक्षा देशमुख यांच्यासह आफ्रोहचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर व महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माधुरी घावट यांनी व्यक्त केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, एस. टी., महामंडळातील सेवासमाप्त कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदाचे आदेश प्राप्त होऊन आता सेवा बजावत आहेत. मात्र, केवळ जिल्हाधिकारी कार्यालयातील देशमुख यांनाच अद्यापही न्याय मिळालेला नाही. नियुक्ती प्राधिकारी किंवा संबंधित विभागानेच हे आदेश काढावयाचे असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने माहिती अधिकारात दिली आहे.
शासन निर्णयातील अधिसंख्य पदामुळे सेवेत असलेले, सेवानिवृत्त झालेले व मयत झालेल्या कुटुंबीयांना जीवन जगण्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कोविड-१९ बाबत योग्य ती दक्षता घेऊन आफ्रोह या संघटनेने राज्यभर एल्गार पुकारण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ५ जुलै रोजी उपोषण करणार आहेत.