अधिसंख्य पदाचे आदेश न मिळाल्याने विलास देशमुख यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:38 AM2021-07-07T04:38:06+5:302021-07-07T04:38:06+5:30
रत्नागिरी : अधिसंख्य पदाचे आदेश न मिळाल्याने ऑर्गनायझेशन फाॅर राईट ऑफ ह्युमन (आफ्रोह) चे विलास देशमुख यांनी कुटुंबीयांसह तसेच ...
रत्नागिरी : अधिसंख्य पदाचे आदेश न मिळाल्याने ऑर्गनायझेशन फाॅर राईट ऑफ ह्युमन (आफ्रोह) चे विलास देशमुख यांनी कुटुंबीयांसह तसेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माधुरी घावट यांच्यासमवेत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण केले.
अधिसंख्य पदाचे आदेश मिळण्यासाठी सेवासमाप्त लिपिक-टंकलेखक विलास देशमुख गेले १८ महिने जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवीत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय मात्र शासन निर्णयातील सुस्पष्ट आदेश डावलून आदेश देण्यास टाळाटाळ करीत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेल्या दीड वर्षापासून आफ्रोहच्या रत्नागिरी शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत सातत्याने अधिसंख्य पदाचे आदेश मिळण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मार्गदर्शन मागविण्याची आवश्यकता नसताना शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे २५ सप्टेंबर २०२० रोजी मार्गदर्शन मागविण्यात आले. विविध विभागातील सेवासमाप्त कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदाचे आदेश प्राप्त होऊन ते आता सेवा बजावत आहेत. मात्र, केवळ जिल्हाधिकारी कार्यालयातील एकमेव विलास देशमुख यांनाच अद्यापही न्याय मिळाला नाही.
१८ महिने झाले तरीही न्याय न मिळाल्याने विलास देशमुख यांनी आफ्रोह संघटनेच्यावतीने सोमवारी साखळी उपोषणाला प्रारंभ केला. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी हे निवेदन स्वीकारले. निवेदन देताना विलास देशमुख यांच्यासमवेत त्यांचे कुटुंबीय तसेच आफ्रोह संघटनेचे किशोर रोडे, गजानन उमरेडकर, बापूराव रोडे, पंडित सोनवणे, राजेश सनगाळे, कैलास बाविस्कर, प्रियांका इंगळे आदी उपस्थित होते.
यावेळी दत्ता भडकवाड यांनी या उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयाने २५ सप्टेंबर २०२० रोजी सामान्य प्रशासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे. त्यावर चर्चा करून निर्णय होईल, तो कळवितो, असे यावेळी सांगण्यात आले.
..................
फोटो मजकूर
अधिसंख्य पदाचे आदेश न मिळाल्याने ऑर्गनायझेशन फाॅर राईट ऑफ ह्युमनचे विलास देशमुख यांनी कुटुंबीयांसह तसेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर तसेच महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माधुरी घावट यांच्यासमवेत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण केले.