असुर्डे गावाने एकजुटीने नाम फाउंडेशनच्या सहकार्याने केली पाणी समस्येवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:32 AM2021-08-15T04:32:53+5:302021-08-15T04:32:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनने जिल्ह्यातील विकासकामासाठी मुहूर्तमेढ रोवली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनने जिल्ह्यातील विकासकामासाठी मुहूर्तमेढ रोवली ती संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे या गावात. ग्रामस्थांची विकासासाठी एकजूट असेल तर अगदी प्रतिकूल परिस्थितीतही मार्ग निघतो, हे या गावकऱ्यांनी नाम फाउंडेशनच्या सहकार्याने दाखवून दिले आहे. एवढेच नव्हे तर १२० कुटुंबांच्या श्रमदानाने तसेच अगदी मुंबईत नमन, नाटकांचे प्रयोग करून अखेर पाणीप्रश्नावर मात केली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे गाव. एप्रिल-मे महिन्यांत येथील १२० कुटुंबांची पाण्यासाठी दरवर्षीच फरफट व्हायची. पाऊस सुरू होईपर्यंत ग्रामस्थांची परवड व्हायची. पाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी, या उद्देशाने येथील ग्रामस्थांनी नाम फाउंडेशनचे विभागप्रमुख समीर जानवलकर, संगमेश्वर तालुका भगवंतसिंह चुंडावत यांच्याशी संपर्क साधला. नाम फाउंडेशनने या ग्रामस्थांची श्रमदान करण्याची तयारी पाहून लागलीच होकार दिला. ग्रामस्थ आणि नामच्या सहकार्याने गावातील पऱ्याची उंची आणि खोली वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी नाम फाउंडेशनने पाच लाख रुपयांचा आराखडा तयार केला होता.
निधी उभारणे हे मोठे आव्हान या ग्रामस्थांसमोर होते. तरीही उमेद न हरता तत्कालीन सरपंच लावण्या कानसरे, उपसरपंच संतोष पाताडे, सखाराम जोशी, कमलाकर मसूरकर, रामचंद्र कुळ्ये, अनंत लाड, प्रमोद मनवे यांच्यासह सर्वच ग्रामस्थ पाणीप्रश्नासाठी एकवटले. प्रत्येक घराने २०० रुपये वर्गणी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामासाठी मुंबईत नमन, नाटकाचे प्रयोग लावले. असे एक लाख रुपयांचे शिवधनुष्य पेलले. यासाठी मुंबईच्या महालक्ष्मी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष वसंत मनवे, मंगेश पाताडे, अशोक तांबे, आदींचे योगदान महत्त्वाचे होते आणि मग नाम फाउंडेशनने उपलब्ध करून दिलेल्या मशिनरीच्या साहाय्याने कामाला सुरुवात झाली. पऱ्यातील गाळ उपसा करण्यासाठी जाणाऱ्या जेसीबी, आदी मशिनरीसाठी रस्त्याची गरज होती. मात्र, रस्ता रुंदीकरणासाठी गावातील शांताराम मनवे, जानू शिवगण, तुकाराम पाताडे, लक्ष्मण मनवे, नथुराम मनवे, आदी ग्रामस्थ आपली जमीन देण्यासाठी पुढे आले. ‘नाम’च्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या श्रमदानाने या पऱ्यातील गाळ उपसा करून खोली व उंची वाढविण्यात आली. या पऱ्यातील अंदाजे १६०० क्युबिक मीटर इतर गाळ उपसा झाला. त्यामुळे साधारण १६ लाख लिटर पाणीसाठा होऊ लागला आहे.
ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि नाम संस्थेच्या सहकार्याने असुर्डे गावच्या १२० कुटुंबांचा पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. गावात एकजूट असेल तर कुठलीही समस्या सुटते, याची प्रचिती या गावाने दिली आहे.