gram panchayat election: ग्रामपंचायत निवडणुकीत गावपॅनल ‘बॅकफुटवर’, मतदार संभ्रमित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 06:54 PM2022-12-05T18:54:05+5:302022-12-05T18:54:28+5:30
विकास कामात राजकारण नको? गावचा विकास महत्त्वाचा? गावच्या विकासात राजकारण्यांना वेशीबाहेर ठेवू या? या गोष्टी केवळ गोष्टी म्हणूनच राहिल्या आहेत.
प्रशांत सुर्वे
मंडणगड : मंडणगड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका १८ डिसेंबर २०२२ रोजी होत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी दुरंगी लढत पाहायला मिळत आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय असणारे गावपॅनल राजकारणाच्या गर्तेत ‘बॅकफुट’वर राहिले आहे.
राज्यातील राजकारणाचे बदलते समीकरण पाहता ग्रामीण भागातील मतदार संभ्रमित आहेत. निवडणुकीत मात्र वाडीवाडीवर बैठका होऊन शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) अशी समोरासमोरील थेट दुरंगी लढत होत आहे. गावच्या विकासाकरिता पक्षविरही राजकारण करू या? विकास कामात राजकारण नको? गावचा विकास महत्त्वाचा? गावच्या विकासात राजकारण्यांना वेशीबाहेर ठेवू या? या गोष्टी केवळ गोष्टी म्हणूनच राहिल्या आहेत.
गावागावांमध्ये गटातटाचे राजकारण शिरलेले दिसत आहे. जनतेमधून थेट सरपंच निवडीमुळे पक्षाचा झेंडा महत्त्वाचा बनला आहे. ग्रामीण भागात ‘गावचा विकास तर पक्षाचा झेंडा हमखास’ असाच प्रचार हाेत आहे. बदलत्या राजकारणात गावपॅनलही गावाबाहेरच राहिले आहे.
कधी रात्री तर कधी पहाटे अर्ज भरणा
निवडणुकीसाठी ऑनलाइन अर्ज भरणे व त्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवताना कार्यकर्त्यांच्या नाकीनऊ आले होते. वेबसाईट नीट चालत नाही, सर्व्हर डाऊन, इंटरनेट जाणे त्याचबरोबर अटींची परिपूर्ण माहिती भरेपर्यंत असंख्य अडचणींना पार करणे निवडणुकीपेक्षा कठीण बनले होते. सर्व्हर डाउन यामुळे काही जणांनी रात्री १२ नंतर अर्ज भरले तर अनेक जण पहाटे ४ वाजल्यापासून अर्ज भरत होते.