cyclone : निसर्ग चक्रीवादळामुळे पर्यटकांचे खास आकर्षण असलेले गाव संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 03:23 PM2020-06-10T15:23:43+5:302020-06-10T15:25:31+5:30
हिरवीगर्द झाडी, सुंदर सागरी किनारा आणि नारळी पोफळीच्या बागा असे चित्रात आणि कथा कवितांमध्ये उल्लेख असलेल्या कासवांचे गाव वेळासचे आज रूपच पालटले आहे. निसर्गाने भरभरुन दिलेल्या वेळासकरांना आज निसर्गानेच मारले आहे.
मंडणगड : हिरवीगर्द झाडी, सुंदर सागरी किनारा आणि नारळी पोफळीच्या बागा असे चित्रात आणि कथा कवितांमध्ये उल्लेख असलेल्या कासवांचे गाव वेळासचे आज रूपच पालटले आहे. निसर्गाने भरभरुन दिलेल्या वेळासकरांना आज निसर्गानेच मारले आहे.
निसर्ग चक्रीवादळात निसर्गरम्य वेळास गावचे रूपच पालटले आहे. इथली बागायत पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. नारळी, पोफळी, आंबा, रातांबा, फणस व मसाल्यांची झाडे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तीन तासांकरिता आलेल्या या वादळाने वेळासकरांना ५० वर्षांहून अधिक मागे नेवून ठेवले आहे.
हजारो लागती झाडे या वादळात गवताप्रमाणे उखडून गेली आहेत. घर संसाराचे नुकसान झाले आहे. एकवेळ घराचे झालेले नुकसान पचवता येईल पण वाडीचे नाही, अशी स्थिती आज इथल्या प्रत्येक ग्रामस्थाची झालेली आहे. एका बाजूला डोंगर, तर दुसरीकडे समुद्र यामुळे मर्यादित जागा असूनही बागायती फुलवलेल्या वेळासकरांना आता पुढे काय करायचे, असा प्रश्न पडला आहे.
याआधी सुमारे ५० ते ६० वर्षांपूर्वी या गावात समुद्राच्या उधाणाचे पाणी शिरले होते. यामुळे गावातील दांडा परिसरातील अनेक गावे उधाणच्या आहारी गेली होती. मोठ्या प्रमाणात हानी व घरांचे नुकसान झाले होते. आता निसर्गाच्या प्रकोपामुळे वेळास गाव पूर्णपणे नेस्तनाबूत झाले आहे.
कासवांचे गाव म्हणून ओळख
वेळास गावची आणखी एक ओळख म्हणजे हे गाव कासवांचे प्रजननस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. यामुळे गावात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. कासव येत असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील सुरुची बने वादळामुळे नष्ट झाली आहेत. वादळामुळे कासवांच्या विणी हंगामाला फटका बसू शकतो. तसे झाल्यास वेळास गावच्या पर्यटन विकासावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे. या परिसरात असणाऱ्या समुद्र घारी आणि काही दुर्मीळ पक्षी (गरुड) प्रजातींच्या घरट्यांवरही निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम झाला आहे.
ऐतिहासिक वारसा
पेशव्यांच्या दरबारातील ह्यनानाह्ण हे मूळचे वेळास गावचेच. एका बाजूने अरबी समुद्र, तर दुसरीकडे बाणकोटचा किल्ला. नारळी-पोफळीच्या वडिलोपार्जित बागा, असा डौल या वेळास गावचा होता. दोन अडीचशे घरे असलेले हजार बाराशे लोकवस्तीचे हे वेळास गाव. नाना फडणवीस यांच्या वारशाने हे गाव आजही ओळखले जात आहे.
कोरोनाचाही विसर
तालुक्यातील कमावता मोठा वर्ग मुंबईमध्ये रोजगाराला आहे. त्यामुळे गावातील घरे बंद आहेत. वादळामुळे बंद घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शनिवारपासून तालुक्यात चाकरमानी मोठ्या संख्येने परत येत आहेत. ही सर्व मंडळी कोरोनाला विसरुन आपापली घरे स्थानिकांच्या मदतीने दुरुस्त करुन घेण्यात गुंतलेली आहेत.