खेडमध्ये तेरा दुकाने फोडली
By admin | Published: July 14, 2014 12:09 AM2014-07-14T00:09:27+5:302014-07-14T00:11:56+5:30
आठजणांचीच फिर्याद
खेड : शहरातील तब्बल १३ दुकाने चोरट्यांनी फोडली असून, तब्बल पावणेदोन लाखांचा ऐवज लांबविला आहे. काल, शनिवारी मध्यरात्री मुसळधार पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी या चोऱ्या केल्या. याप्रकरणी फक्त आठच जणांनी खेड पोलिसांत चोरी झाल्याची फिर्याद नोंदविली आहे. गुहागरमध्ये सात दुकाने फोडल्यानंतर आता आपला मोर्चा चोरट्यांनी खेड शहराकडे वळविला आहे.
शिवाजीनगर येथील सर्फराज पांगारकर हे आपले दुकान रात्री नेहमीप्रमाणे बंद करून घरी निघून गेले. आज, रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ते दुकान उघडण्यासाठी आले तेव्हा त्यांना आपल्या एस. एम. इलेक्ट्रिकलच्या बंद शटरची कुलपे तुटलेली आढळली. त्यांनी पाहणी केली असता २७०० रुपये किमतीच्या मोबाईलच्या बॅटऱ्या चोरल्याचे लक्षात आले. तसेच शिवाजीनगर येथील समीर सिकंदर नांदगावकर यांच्या सानिया लेडीज कलेक्शन या दुकानाचे शटर तोडून १० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्यांनी लांबविला आहे. शेजारी असलेल्या असिम अहमद खतीब यांच्या नकी स्पेअर्स पार्टस् या दुकानाचे शटर तोडून १४०० रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लांबविली आहे. तसेच शेजारीच असलेल्या अश्फाक इब्राहिम देसाई यांच्या देसाई ट्रेडर्स अॅण्ड प्लायवूड हे दुकानदेखील फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला; परंतु ते अयशस्वी ठरले. त्यानंतर चोरट्यांनी समर्थनगर येथील एमएसईबी कार्यालयानजीक असलेल्या शेखर महादेव शेठ यांची वीस हजार रुपये किमतीची दुचाकी (एचएच-०८-यू-८२०८)देखील चोरून नेली. तेथून चोरट्यांनी शहरातील तीनबत्ती नाका येथील मुकादम कॉम्प्लेक्स येथील नासीर शेख यांचे झेरॉक्स सेंटर व मोबाईल विक्रीचे दुकान फोडून चोरट्यांनी ५३ हजार रुपयांची रोकड लांबविली. त्याच कॉम्प्लेक्समधील आकाश एंटरप्रायझेस हे अतुल शेठ यांचे दुकान फोडून चोरट्यांनी ७५०० रुपये रोख, तर यासीन मलिक शेख यांचे सिझन जेंटस् वेअर हे टेलरिंग दुकान फोडले व १० हजार रुपये रोख रक्कम लांबविली. (प्रतिनिधी)