खेड आंबवलीच्या ग्रामस्थांची टँकरची प्रतीक्षा संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:27 AM2021-04-05T04:27:55+5:302021-04-05T04:27:55+5:30
खेड : तालुक्यातील आंबवली - भिंगारा ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी १० दिवसांपूर्वी प्रशासनाकडे धाव घेतली होती. त्यानंतर शनिवारपासून टँकरने पाणीपुरवठा ...
खेड : तालुक्यातील आंबवली - भिंगारा ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी १० दिवसांपूर्वी प्रशासनाकडे धाव घेतली होती. त्यानंतर शनिवारपासून टँकरने पाणीपुरवठा सुरू झाल्याने तहानलेल्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
आंबवली - भिंगारा येथील ग्रामस्थांनी २३ मार्च रोजी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. प्राथमिक सर्वेक्षणात प्रशासनाने काही दिवस पुरेल इतका पाणीसाठा असल्याचा निष्कर्ष काढला होता. मात्र, शनिवारपासून आंबवली - भिंगारा येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. तालुक्यात खवटी - खालची व वरची धनगरवाडी पाठोपाठ आंबवली - भिंगारा येथेही टँकर धावू लागल्याने तालुक्यात दोन गावे व दोन वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील सवणस-मूळगाव ग्रामस्थांनाही तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. खाडीपट्टा विभागातील सवणस मूळगाव येथेही जलस्रोत आटल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी दाहीदिशा सुरू झाली आहे. त्यामुळे येथील तहानलेल्या ग्रामस्थांनी शनिवारी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे.