रत्नागिरी जिल्ह्यातील 'या' गावात ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी जावे लागते ढोपरभर पाण्यातून, पूल बांधण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 04:43 PM2022-07-15T16:43:24+5:302022-07-15T16:43:50+5:30
एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाच, आजही ग्रामीण भागात अनेक महत्त्वाच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत.
असगाेली : गुहागर तालुक्यातील वरवेली तेलीवाडीतील ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी नेताना नदीतील ढोपरभर पाण्यातून प्रवास करून न्यावे लागत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. या नदीवर पूल बांधण्याची मागणी करूनही आजवर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने माणसाच्या मरणानंतरही त्याचा प्रवास खडतरच असल्याचे दिसत आहे.
एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाच, आजही ग्रामीण भागात अनेक महत्त्वाच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. या सोयी-सुविधांकडे शासन व लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना आता मरणानंतरही हाल भोगावे लागत आहेत, मृत्यूनंतर तरी शासन आम्हाला सुखाने मरण देईल का, असा प्रश्न केला जात आहे. गुहागर तालुक्यातील वरवेली-तेलीवाडी येथील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात कंबरभर पाण्यातून नदी ओलांडून स्मशानभूमीकडे जावे लागत आहे. या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसून प्रेतयात्रा नेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामीण भागात स्मशानभूमीचा विकास करणे हे दूरच राहिले आहे. विजेची समस्या, अडचणीच्या पायवाटा तसेच भर पावसात नदी-ओढ्यातून कंबरभर पाण्यातून चाललेली प्रेतयात्रा तसेच दगड-धोंड्यातून चाललेला प्रवास ही अवस्था वरवेली तेलीवाडीतील ग्रामस्थांची आहे.
वरवेली तेलीवाडीच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना दगड-गोटे तुडवीत, नादुरुस्त रस्त्यावरून, जंगल भागातून अंत्ययात्रा न्यावी लागत आहे. वरवेली तेलीवाडीच्या स्मशानभूमीलगत असणाऱ्या नदीवर पूल बांधून मिळावा, अशी मागणी केली जात आहे.
स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पायवाटा तसेच रस्ते त्याची शासन दप्तरी नोंद नाही. याठिकाणी असणाऱ्या नदीवर पूल बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, शासकीय नियमांचे अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात प्रेत नेताना नदी ओढ्यातून जावे लागत आहे. ग्रामस्थांच्या या व्यथेकडे लाेकप्रतिनिधी, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.