विनय नातू महान : भास्कर जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 06:40 PM2017-10-13T18:40:50+5:302017-10-13T18:43:52+5:30
असगोली गावाला नगरपंचायतीतून वगळण्याची अधिसूचना निघालेली नाही. २५ आॅक्टोबरपर्यंत ही अधिसूचना निघाली नाही तर डॉ. नातू यांचेच हसे होणार असून, त्यांचे कर्तृत्वच महान आहे, असा टोला आमदार भास्कर जाधव यांनी लगावला.
गुहागर, दि. १३ : असगोली गावाला नगरपंचायतीतून वगळण्याची अधिसूचना निघालेली नाही. २५ आॅक्टोबरपर्यंत ही अधिसूचना निघाली नाही तर डॉ. नातू यांचेच हसे होणार असून, त्यांचे कर्तृत्वच महान आहे, असा टोला आमदार भास्कर जाधव यांनी लगावला.
असगोली हे गाव सर्वसंमतीने गुहागर नगरपंचायतीमध्ये समाविष्ट झाले होते. यामुळे ज्या असगोलीचा सर्वसमावेशक असा विकास होणार होता, ते गाव नगरपंचायतीतून वगळण्यात आल्याचे माजी आमदार डॉ. विनय नातूंनी ग्रामस्थांना सांगून स्वत:ची मिरवणूक काढून घेतली. सत्ताबदल झाल्यानंतर या सत्तेचा दुरूपयोग करीत असगोली गाव नगरपंचायतीतून वगळल्याचे सांगत स्वत:चा सत्कार करून घेतला. परंतु, अद्यापपर्यंत असगोली गावाला नगरपंचायतीतून वगळण्याची अधिसूचना निघालेली नाही. २५ आॅक्टोबरपर्यंत ही अधिसूचना निघाली नाही तर डॉ. नातू यांचेच हसे होणार असून, त्यांचे कर्तृत्वच महान आहे, असा टोला आमदार भास्कर जाधव यांनी लगावला.
गुहागरच्या ग्रामीण भागाचा दौरा पूर्ण केल्यानंतर आमदार जाधव हे गेले दोन दिवस गुहागर शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी प्रत्येक प्रभागात जात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांना दिलेला विकासकामांचा शब्द, त्यांची झालेली पूर्तता याबाबतचा आढावा घेताना शहरातील नवे प्रश्न समजावून घेत ते सोडवण्याबाबत त्यांनी यावेळी तत्काळ निर्णय घेतले.
यावेळी नागरिकांनी जाधव यांच्याकडे असगोलीला नगर पंचायतीतून वगळण्यात आल्याबाबत विचारणा केली असता, ते म्हणाले की, ग्रामपंचायतींना मिळणारा निधी हा अत्यंत तूटपुंजा असतो. त्यामुळे विकासाला चालना मिळायला हवी असेल तर गावात नगरपंचायत व्हावी किंंवा गाव नगरपंचायतीमध्ये समाविष्ट व्हावे, यासाठी गावांची धडपड सुरु असते. परंतु, लोकांचा विकास होऊ नये, हीच इच्छा विनय नातू यांची असावी. म्हणूनच त्यांनी हा सारा खटाटोप केल्याचे जाधव म्हणाले.
या दौऱ्यात पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, तालुकाध्यक्ष विनायक मुळ्ये, नगराध्यक्षा स्नेहा भागडे, उपनगराध्यक्ष नरेश पवार, माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे यांच्यासह सर्व नगरसेवक, सभापती आणि पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.