राणे, स्वत:च्या बुडाखाली काय जळतंय ते पाहा; विनायक राऊत यांची टीका
By मनोज मुळ्ये | Published: June 27, 2023 12:05 PM2023-06-27T12:05:58+5:302023-06-27T12:08:01+5:30
'मंत्री राणेंनी कितीजणांना रोजगार दिला'
रत्नागिरी : स्वत:च्या बुडाखाली काय जळत आहे, हे न पाहता केंद्रीय मंत्री नारायण राणे इतर प्रकरणांमध्ये अधिक लक्ष घालत आहेत. नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केले, आपण मंत्री झाल्यानंतर कितीजणांना रोजगार दिला, हे सांगण्यापेक्षा राणे यांनी आपल्या भाषणातील सर्वाधिक वेळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड करण्यामध्येच घालवला, अशी टीका ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली.
रत्नागिरीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नारायण राणे यांच्यासह माजी खासदार नीलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्यावरही टीका केली. राणे यांच्या राजापुरात झालेल्या जाहीर सभेला इकडून तिकडून फक्त ७०० माणसे आली होती. त्यात आपल्या पक्षाने काय केले, हे सांगण्यापेक्षा राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यातच अधिक वेळ घालवला, असे ते म्हणाले.
ईडीने दणका दिल्यानंतर त्यापासून वाचवण्यासाठी भाजपचे पाय चाटण्यासाठी गेलेले उपरे नेते असाही त्यांनी मंत्री राणे यांचा उल्लेख केला. स्वत:च्या बुडाखाली काय जळत आहे, ते न राहता रमेश मोरे, जयंत जाधव यांच्याबद्दल राणे विचारणा करत आहेत. त्यांच्याबाबतचा तपास पोलिसांनी केला आहे आणि ज्यांचे स्वत:चे हात बरबटलेले आहेत, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची नौटंकी केली आहे, असे सांगताना खासदार राऊत यांनी श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यवियज भिसे, अंकुश राणे अशा नावांचा उल्लेखही केला.
आपल्या ४४ मिनिटांच्या भाषणातील ३६ मिनिटे उद्धव ठाकरे यांच्याविषयी द्वेषाने बोलणा-या राणे यांनी मंत्रिपदाच्या काळात आपण कितीजणांना रोजगार दिला, हे सांगितले नाही. उद्धव ठाकरे यांनी जे दिले, ते मिंधे सरकार देऊ शकत नाही, असेही राऊत म्हणाले. राणे यांचे वैद्यकीय महाविद्यालय उद्धव ठाकरे यांनीच दिले असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी खासदार राऊत यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावरही टीका केली. जे. के. फाईल्स कंपनीच्या १८ एकर जागेवर भूमाफियांचा डोळा असल्याचा आरोप करतानाच त्यांनी हा उद्योग बंद होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची मदत घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.