निर्दोष सुटल्यानंतर मनाई आदेशाचा भंग, ४० जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:52 PM2019-08-24T12:52:17+5:302019-08-24T12:53:41+5:30
न्यायालयाने निर्दोष ठरविल्यानंतर मुन्ना देसाईसह ११ संशयितांना रत्नागिरीच्या कारागृहातून हातखंबा येथे परत नेले जात होते. मात्र, मारूती मंदिरच्या पुढे बॅँक आॅफ इंडियासमोरील रस्त्यावर रॅली काढून वाहने धोकादायकरित्या हाकली.
रत्नागिरी : न्यायालयाने निर्दोष ठरविल्यानंतर मुन्ना देसाईसह ११ संशयितांना रत्नागिरीच्या कारागृहातून हातखंबा येथे परत नेले जात होते. मात्र, मारूती मंदिरच्या पुढे बॅँक आॅफ इंडियासमोरील रस्त्यावर रॅली काढून वाहने धोकादायकरित्या हाकली.
ओरडून किंचाळून दहशत निर्माण होईल, असे वातावरण तयार केले तसेच जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचा भंग केला, असे पोलिसांना ध्वनीचित्रफीतीमध्ये आढळले. याप्रकरणी मुन्ना देसाई, महेश तथा बाबू म्हाप व सागर म्हापुसकर यांच्यासह ३० ते ४० जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश अरविंद कुबडे (रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. २१ आॅगस्ट रोजी मुन्ना देसाईसह ११ जणांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर त्यांची सुटका होणार असल्याने कारागृहाबाहेर गर्दी जमली होती. त्यासंदर्भात गोपनीय सुत्रांकडून पोलिसांना व्हिडिओ क्लीप मिळाली. त्यात वाहनांमध्ये धोकादायक पद्धतीने बसून धोकादायक स्थितीत वाहने चालविल्याचे दिसले.
तसेच गाड्यांचे इंडिकेटर, हेडलाईट्स लावून हॉर्नही जोरजोरात वाजविण्यात आले. वाहतुकीला अडथळा निर्माण करून रॅली काढली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी ४० जणांविरोधात भारतीय दंड विधान कलम १४३, १४९, २७९, ३३६, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३)चा भंग, तसेच १३५, ११०, ११२,/११७, मोटारवाहन कायदा कलम १८४, ६६ / १९२, १२२ / १७७, १२३ (१) (२) / १७७, १९० नुसार गुन्हा दाखल केला आहे.