व्हायरल सर्दी-तापाचा मुलांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:38 AM2021-09-09T04:38:12+5:302021-09-09T04:38:12+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाचे संकट सुरू असतानाच आता बदलत्या वातावरणामुळे मुलांमध्ये तापसरी, सर्दी आदी साथीचे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाचे संकट सुरू असतानाच आता बदलत्या वातावरणामुळे मुलांमध्ये तापसरी, सर्दी आदी साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर पसरू लागले आहेत. त्यातच डेंग्युसदृश लक्षणांनी पालकांमध्ये चिंता निर्माण केली आहे. त्यामुळे खासगी दवाखाने तसेच जिल्हा रुग्णालयात सध्या बाल रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट बालकांना धोकादायक असल्याचे आरोग्य क्षेत्रातून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या पालक धास्तावलेले आहेत. त्यातच सध्या डेंग्यूची साथ असल्याने चिंता अधिक वाढली आहे. व्हायरल सर्दी-तापामुळे मुले बेजार होत असून सध्या रुग्णालयात मुलांची गर्दी होत आहे.
................
ही घ्या काळजी
सध्या वातावरणात गारवा आहे. त्यामुळे मुलांना थंड पदार्थ किंवा पाणी देवू नका. डास येऊ नयेत, म्हणून घराच्या खिडक्यांना जाळी लावा. तेलकट तसेच बाहेरचे पदार्थ त्यांना देऊ नका. आजुबाजुच्या परिसरात पाणी साठत नाही याची दक्षता घ्या. मुलांना ताप, पोट, डोकेदुखी, उलटी आदी लक्षणे दिसताच त्वरित उपचार करा.
................
जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीत रुग्ण वाढले
रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या ओपीडीत सध्या बालरूग्णांचे प्रमाण वाढले आहे. या ओपीडीत दहा रूग्णांमागे सध्या तापसरी, सर्दी - खोकला या साथरोग आजारांची ५ ते ६ मुले उपचारासाठी येत आहेत. प्राैढांपेक्षा मुलांची संख्या वाढली आहे.
............
कोरोना नाही, डेंग्यूचेही संकट वाढले
सध्या कोरोनाची भीती असतानाच डेंग्यूच्या साथीने चिंता अधिक वाढवली आहे. त्यामुळे लक्षणे असलेल्या मुलांची चाचणी करताना डेंग्यू, मलेरिया आदी आजार पुढे येतात. खबरदारी म्हणून या मुलांच्या चाचण्या वेळेत केल्या जात आहेत.
.........
व्हायरल ताप - सर्दी मुलांमध्ये वाढली आहे. त्यातच डेंग्यूची साथही सुरू असल्याने अधिक खबरदारी म्हणून लक्षणे असलेल्या मुलांच्या डेंग्यूविषयक चाचण्याही कराव्या लागत आहेत.
- डाॅ. रोहित पाटील, बालरोगतज्ज्ञ, जिल्हा रूग्णालय, रत्नागिरी.