विठुरायाला ओढ असते हिशामुद्दीन बाबांच्या दर्ग्याची
By admin | Published: October 31, 2014 12:21 AM2014-10-31T00:21:42+5:302014-10-31T00:30:49+5:30
शेकडो वर्षांची परंपरा : एकात्मतेचे दर्शन देव घडवतात अन् आपण...?
मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरी
देशात जाती-धर्मावरून वारंवार वाद उत्पन्न होतात. दंगे-धोपे होतात. देवाच्या ठिकाणी एकजण उच्च, तर दुसरा नीच असा भेदाभेद होतो. प्राचीन काळापासून चालत आलेले हे वाद विज्ञानयुगातही तसेच सुरु आहेत. पण, देवाच्या दरबारी असा भेदाभेद नाही. कारण रत्नागिरीचं दैवत असलेल्या विठुरायालाही हिशामुद्दीन दर्ग्याची ओढ लागलेलीच असते.
देवाच्या ठायीही एकात्मता आहे, देवानेही ‘सारी मानवजात एकच’, असाच संदेश दिला आहे, याचं हे मूर्तिमंत उदाहरण. शेकडो वर्षांपासून श्री विठ्ठल मंदिरात कार्तिकोत्सव साजरा करण्यात येत आहे. कार्तिकोत्सवाच्या दिवशी मध्यरात्री २ वाजता श्री विठ्ठलाची पंचामृती पूजा झाल्यानंतर काकडारती होते. भजन झाल्यानंतर मंदिरातून श्री विठ्ठलाचा रथ बाहेर पडतो. राधाकृष्ण नाक्यातून रथ धनजीनाका येथे येतो. रथ हिशामुद्दिन बाबांच्या दर्ग्याजवळ येणार असल्याने कमिटीतर्फे दर्गा त्या दिवशी बंद केला जात नाही. शिवाय दिवेही सर्वत्र सुरू ठेवले जातात. त्याचवेळी पालखीतील नारळ दर्ग्याला अर्पण केला जातो. त्यानंतर पालखी दर्ग्यापुढील श्री दत्ताच्या घुमटीकडे येताच ‘कर्पुराती’ होते. भाविक लोटांगणे घालतात. त्यानंतर रथ धामापूरकर गल्लीतून धनजी नाकामार्गे पुन्हा देवळाकडे परततो.
आजपर्यंत शेकडो वर्षांच्या या परंपरेमध्ये अजितबात कधीही खंड पडलेला नाही, शिवाय दोन्ही धर्मातील मंडळी श्रध्देने या सोहळ्यात सहभागी होतात. शांती, सौख्य व एकात्मतेची झलक यातून दिसून येते. पहाटेच्या वेळी रथ दर्ग्याजवळ येतो. श्रध्देने नारळ दर्ग्यात ठेवला जातो. त्यादिवशी दर्गा रात्रीच्या वेळी बंद केला जात नाही. भाविकांसाठी रात्रभर खुला ठेवण्यात येत असल्याचे मंदिराचे ट्रस्टी अशोक मयेकर यांनी सांगितले.
देवालाही एवढी आस असते. देवाच्या ठायीही एकात्मता जोपासली जाते. मग राष्ट्रीय एकात्मतेची पताका वाहणाऱ्या आपणामध्ये ही माणुसकीची आस केव्हा येणार? हाच एक प्रश्न आहे.