आराेग्य केंद्राला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:30 AM2021-05-14T04:30:29+5:302021-05-14T04:30:29+5:30
क्रेडाई चिपळूण संस्थेतर्फे साहित्य भेट चिपळूण : येथील क्रेडाई चिपळूण या संस्थेतर्फे ‘मिशन ब्रेक द चेन’अंतर्गत मंगळवारी पेढांबे येथील ...
क्रेडाई चिपळूण संस्थेतर्फे साहित्य भेट
चिपळूण : येथील क्रेडाई चिपळूण या संस्थेतर्फे ‘मिशन ब्रेक द चेन’अंतर्गत मंगळवारी पेढांबे येथील कोविड केअर सेंटरला दैनंदिन वापरातील आवश्यक साहित्य भेट स्वरूपात दिले. या सेंटरसाठी फॅन, ट्यूब, बकेट, चटई आदी वस्तू आ. शेखर निकम यांच्या हस्ते डॉ. ज्योती यादव यांच्याकडे दिल्या. यावेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, क्रेडाई चिपळूणचे अध्यक्ष राजेश वाजे, सचिव संतोष तडसरे, ट्रेझरर समीर मेमन, माजी अध्यक्ष जावेद दलवाई, सदस्य प्रवीण पटेल, मन्सूर देसाई उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी प्रमेय आर्यमाने
गुहागर : ग्रामसंवाद सरपंच महाराष्ट्र राज्य संघाची स्थापना करण्यात आली होती. ऑनलाइन राज्य, मराठवाडा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातील नूतन जिल्हाध्यक्ष निवड करण्यात आली. तेव्हा सर्वानुमते गुहागर तालुक्यातील आबलोली ग्रामपंचायतीचे सदस्य प्रमेय प्रदीप आर्यमाने यांची रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड करीत असल्याची घोषणा राज्य अध्यक्ष अजिनाथ धामणे यांनी केली.
प्रभागनिहाय लसीकरण करावे
चिपळूण : शहरासह ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण मोहिमेत पुरता गोंधळ उडाला आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लस घेण्यासाठी नागरिकांना पहाटेपासून त्रास सहन करावा लागत आहे. याबरोबरच लसीकरण केंद्र मर्यादित असल्याने तेथे गर्दीचे प्रमाण वाढले आहे. शासनाने हे लसीकरण ग्रामपंचायत स्तरावर तसेच नगर परिषद हद्दीत प्रत्येक प्रभागात सुरू करावे, अशी मागणी मिरजोळी येथील रहिमान दलवाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
दापोलीत शिक्षक संघातर्फे साहित्य वाटप
दापोली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र विविध उपाययोजना आखल्या जात असून दापोलीतील अखिल महाराष्ट्र शिक्षक संघामार्फत उपजिल्हा रुग्णालय दापोली, पंचायत समिती शिक्षण विभाग, शिक्षक पतसंस्था येथे विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. संघटनेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे ४ ऑक्सिमीटर व सॅनिटायझर, कोकण कृषी विद्यापीठ कोरोना केअर सेंटर येथे २ ऑक्सिमीटर व सॅनिटायझर तसेच पंचायत समिती शिक्षण विभाग दापोली येथे कर्मचाऱ्यांसाठी ग्लोज, मास्क, व्हिटॅमीन गाेळ्या असे १० किट्स देण्यात आले.