रत्नागिरी जिल्ह्यात ओबीसी समाजाचा घुमला आवाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 05:33 PM2020-11-03T17:33:10+5:302020-11-03T17:35:12+5:30
OBC Reservation, tahasildaroffice, ratnagirinews मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणामध्ये समावेश करण्यात येऊ नये. तसेच ओबीसी समाजाच्या प्रमुख १६ प्रलंबित असलेल्या मागण्याची शासनाला जाग यावी यासाठी ओबीसी संघर्ष समन्वय समितीतर्फे जिल्हाभरात निदर्शने करण्यात आली. तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी संघर्ष समितीतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
रत्नागिरी : मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणामध्ये समावेश करण्यात येऊ नये. तसेच ओबीसी समाजाच्या प्रमुख १६ प्रलंबित असलेल्या मागण्याची शासनाला जाग यावी यासाठी ओबीसी संघर्ष समन्वय समितीतर्फे जिल्हाभरात निदर्शने करण्यात आली. तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी संघर्ष समितीतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत ओबीसी संघर्ष समन्वय समितीने जिल्हाभरात मंगळवारी निदर्शने केली. लांजा येथील कुलकर्णी - काळे छात्रालय येथून एकत्र येत तहसीलदार कार्यालयात येथील मैदानात सभेत रुपांतर झाले. मंडणगड शहरातील कुणबी भवन येथे सकाळी ओबीसी समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
यावेळी आरक्षणाच्या प्रश्नासह विविध मागण्यांसाठी आंदोलन प्रखर करण्याचा निर्धार करण्यात आला. त्यानंतर सोशल डिस्टसींगचे नियमांचे पालन करत तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.
राजापूर येथे ओबीसी आरक्षण बाधित राहिले पाहिजे यांसारख्या विविध घोेषणा देण्यात आल्या. त्यानंतर, ओबीसी संघर्ष समन्वय समिती, राजापूूरतर्फे विविध मागण्यांचे शासनाला द्यावयाचे निवेदन तहसीलदार प्रतिभा वराळे यांना देण्यात आले. गुहागर बसस्थानक येथे सकाळी गुहागर तालुक्यातील सर्व ओबीसी समाजबांधव जमा झाले. त्यानंतर तेथून गुहागर तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. ओबीसी संघर्ष समन्वय समितीतर्फे आरक्षण बचावासाठी दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन देण्यात आले.
कोणत्याही स्थितीत मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश होऊ नये, अशी जोरदार मागणी करत ओबीसी संघर्ष समन्वय समितीतर्फे चिपळुणात जोरदार एल्गार करण्यात आला. तसेच प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना निवेदन देण्यात आले.