स्वयंसेवक धावले मदतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:23 AM2021-04-29T04:23:20+5:302021-04-29T04:23:20+5:30
रत्नागिरी : एकंदरीत जिल्ह्यात पोलिसांची संख्या कमी आहे. या यंत्रणेतील अपुरे मनुष्यबळ लक्षात घेऊन कोरोना काळात एनसीसीचे विद्यार्थी पोलिसांच्या ...
रत्नागिरी : एकंदरीत जिल्ह्यात पोलिसांची संख्या कमी आहे. या यंत्रणेतील अपुरे मनुष्यबळ लक्षात घेऊन कोरोना काळात एनसीसीचे विद्यार्थी पोलिसांच्या मदतीला धावून आले आहेत. गेले वर्षभर संचारबंदीच्या काळात एनसीसीच्या २० प्रशिक्षित स्वयंसेवकांनी कोणतेही मानधन न घेता बंदोबस्तासाठी मदत केली आहे.
बँकांचे हप्ते थकले
चिपळूण : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले आहे. त्यामुळे दूध, भाजीपाला, फळे आदी अत्यावश्यक वस्तू वगळता इतर सर्व व्यवसाय बंद आहेत. बहुसंख्येने अशा व्यवसायांसाठी बँकांकडून कर्ज उचलले आहे. मात्र आता व्यवसायच बंद असल्याने थकलेले हप्ते कसे भरायचे, ही चिंता सतावत आहे.
अखेर पाणी समस्या सुटली
रत्नागिरी : शहरातील स्टॅन्डर्ड अपार्टमेंंटमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांच्या निवासस्थानात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. सात दिवस पाणीच न आल्याने अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागले होते. अखेर याची दखल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी तातडीने घेतल्याने तात्काळ कार्यवाही करून या रहिवाशांना नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा सुरू केला आहे.
सागवानाची तोड
दापोली : तालुक्यातील आसूद येथे सध्या विनापरवाना मोठ्या प्रमाणावर सागवान झाडांची तोड केली जात आहे. मात्र हे गाव दापोली मुख्यालयापासून अगदी जवळ असूनही वन विभागाचे लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या लाकडांचा साठा आसूद येथे रचून ठेवण्यात आला आहे.
चिंता वाढली
खेड : कोरोनाने आधीच संहारक रूप दाखविण्यास सुरुवात केली आहे. या दुसऱ्या लाटेत कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे आता नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीती निर्माण झाली आहे. मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश अधिक असल्याने घरातील ज्येष्ठांची काळजी चांगल्याप्रकारे घेतली जात आहे.
दुकानदारांचे नुकसान
रत्नागिरी : सध्या दूध, फळे आणि भाजीपाला यांची दुकाने केवळ चार तास सुरू ठेवण्यात येत आहेत. मात्र फळे आणि भाजीपाला हे नाशवंत असल्याने या चार तासानंतर वाढत्या उष्णतेचा परिणाम फळे आणि भाजीपाल्यावर होत आहे. बऱ्याच व्यापाऱ्यांची फळे आणि भाजीपाला वाया जाऊ लागल्याने या दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
आदिवासी वाड्यांमध्ये चारा
चिपळूण : येथील सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेतर्फे आदिवासी वस्तीतील जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. येथील पाळीव जनावरांना चरायला पुरेसे गवत नसल्याने त्यांची उपासमार होत होती. मात्र संस्थेचे सोनल प्रभुलकर आणि सदफ कडवेकर यांच्या प्रयत्नातून आठ टन चारा या वाड्यांमध्ये देण्यात आला आहे.
रस्त्याची दयनीय अवस्था
पावस : रत्नागिरी तालुक्यातील डोर्ले - हर्चै रस्त्याची दयनीय अवस्था बनली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची ये-जा करताना चालकांना कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रस्ता कामाचे भूमिपूजन
दापोली : येथील आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने दाभोळ, भिवबंदर रस्ता कामासाठी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या रस्ता कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती रेश्मा झगडे यांच्याहस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी तालुका संघटक उन्मेश राजे, दीपक घडसे आदी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांची गर्दी कायम
देवरुख : लॉकडाऊनच्या अनुषंगाने शासनाने सर्व कार्यालयांना १५ टक्केच कर्मचारी उपस्थित ठेवण्यात यावेत, असे आदेश दिले आहेत. मात्र शासकीय कार्यालयांकडून या नियमाला धुडकावत सर्वच कर्मचाऱ्यांना उपस्थित ठेवले जात आहे, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.