मतदार याद्या शुद्धीकरण होणार
By admin | Published: March 19, 2015 09:26 PM2015-03-19T21:26:34+5:302015-03-19T23:53:33+5:30
दोष दूर करणार : ओळखपत्राचा डाटा तयार करण्याचा जिल्हाभर कार्यक्रम
रत्नागिरी : भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार याद्यांमधील, दोष दूर करण्यासाठी तसेच मतदार याद्यांमध्ये नाव नोंदणी, दुरूस्ती याबाबत आॅनलाईन सुविधा नागरिकांना उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय मतदार याद्या शुध्दीकरण व प्रमाणिकरण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत मतदाराच्या मतदार ओळखपत्राचा डाटा ‘युआयडी’ च्या आधारकार्ड डाटाशी जोडणे यासह विविध कार्ये करण्यात येणार आहेत. कार्यक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वीप कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.अेल.ओ) हे क्षेत्रीय स्तरावरील शासकीय यंत्रणेचे अधिकारी, स्थानिक संस्थाचे प्रतिनिधी, शाळा,कॉलेज यांचे मुख्याध्यापक, अेन. अेस. अेस, नेहरु युवा केद्र यांचे स्वंयसेवक यांचे केंद्रस्तरीय जागरूकता गट स्थापन करणार आहेत. या जागरूकता गटामध्ये मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी वगळता अन्य कोणताही सदस्य राजकीय पक्षाशी संबंधित नसेल. तसेच प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी विविध उपक्रमांद्वारे या कार्यक्रमांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.कार्यक्रमांअंतर्गत मतदार यादीमध्ये असलेल्या दुबार मतदारांच्या नोंदी, दुबार फोटो, दुबार ओळखपत्र क्रमांक, मतदारांच्या तपशीलामधील चुका आदी दोष दूर करून, मतदार यादी दोषहविरहित करायची आहे, त्याकरिता संबंधित मतदाराने स्वेच्छेने तो सध्या राहत असलेल्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणी केलेल्या मतदार नोंदणी व्यतिरिक्त अन्य मतदान केंद्रामध्ये वा इतर विधानसभा मतदार संघामध्ये नोंदणी केली असल्यास, दुबार नांव वगळणीसाठी नमुना नं. ७ मध्ये भरावी.तसेच ज्या मतदारांचे नाव, वय, पत्ता, लिंंग, फोटो यामध्ये चुका असतील त्यांनी नमुना नं. ८ मध्ये, तसेच विधानसभा मतदार संघाअंतर्गत मतदान केंद्रामध्ये बदल असल्यास नमुना नं. ८ अ संबधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयाठिकाणी असलेल्या मतदार मदत केंद्रामध्ये भरून देऊ शकणार आहेत. मतदाराचे मतदार ओळखपत्राचा डाटा ‘युआयडी’ च्या आधारकार्ड डाटाशी जोडण्यात येणार असल्याने मतदारांनी आपला आधारकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक व ई-मेल पत्ता (असल्यास) आपल्या मतदान केंद्रासाठी नियुक्त केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी. अेल. ओ) अथवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे दयावेत. काही दुरुस्ती अपेक्षित असल्यास, अर्ज सादर करावेत. आधारकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक व ई-मेल पत्ता (असल्यास) संपर्क साधण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)
कार्यक्रमांतर्गत ओळखपत्राचा डाटा ‘युआयडी’ च्या आधार कार्ड डाटाशी जोडणे, सबंधित मतदाराने स्वेच्छेने त्याची दुबार मतदार नोंदणी झालेली असल्यास ती कमी करण्यासाठी नोंदणी अधिकारी यांच्याकडे कळवणे, मतदार नोंदणी अधिकारी यांनी कार्यवाही करणे, आवश्यक ते पुराव्याचे कागदपत्र घेऊन दुरुस्ती करणे, खराब फोटोंमध्ये सुधारणा, मतदारांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल पत्ता जमा करणे याचा यात समावेश आहे.