शेवटच्या संधीला आता मतदारच कंटाळले,नव्यांची उपेक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 05:08 PM2020-12-25T17:08:49+5:302020-12-25T17:14:02+5:30

Elecation Ratnagiri -आता एक शेवटची संधी द्या, असे म्हणत वर्षानुवर्षे राजकीय बस्तान मांडणाऱ्या उमेदवारांना आता मतदारही कंटाळले आहेत. वर्षानुवर्षे निवडणूक म्हणजे आपलीच खोतकी असल्याचे समजणाऱ्यांना मतदारांकडूनच आता विरोध होऊ लागला आहे. निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी कधी मिळणार, असा प्रश्न करत अहो दादा, भाई, मामा, आबा आता तरी थांबा, असे म्हणण्याची वेळ रत्नागिरी शहरानजीकच्या एका ग्रामपंचायत हद्दीत आली आहे.

Voters are fed up with the last chance, ignoring the new ones | शेवटच्या संधीला आता मतदारच कंटाळले,नव्यांची उपेक्षाच

शेवटच्या संधीला आता मतदारच कंटाळले,नव्यांची उपेक्षाच

Next
ठळक मुद्दे वर्षानुवर्षांच्या खोतकीला विरोध, ग्रामपंचायत निवडणूक रंगात नवीन उमेदवारांना संधी मिळत नसल्याची खंत, लोकप्रतिनिधीही नव्यांना डावलतात 

रत्नागिरी : आता एक शेवटची संधी द्या, असे म्हणत वर्षानुवर्षे राजकीय बस्तान मांडणाऱ्या उमेदवारांना आता मतदारही कंटाळले आहेत. वर्षानुवर्षे निवडणूक म्हणजे आपलीच खोतकी असल्याचे समजणाऱ्यांना मतदारांकडूनच आता विरोध होऊ लागला आहे. निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी कधी मिळणार, असा प्रश्न करत अहो दादा, भाई, मामा, आबा आता तरी थांबा, असे म्हणण्याची वेळ रत्नागिरी शहरानजीकच्या एका ग्रामपंचायत हद्दीत आली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा होताच अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. रत्नागिरी शहरानजीकच्या शिवसेनेचे वर्चस्व असणाऱ्या एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. तालुक्यातील उमेदवारांची अंतिम यादी शिवसेनेतील वजनदार लोकप्रतिनिधी ठरविणार असल्याने त्यांची मनधरणी करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी कधी रत्नागिरीत तर कधी त्यांच्या घरापर्यंत जाऊन उमेदवारीसाठी विनंत्या करत आहेत.

शहरानजीकच्या या ग्रामपंचायत निवडणुकीत वर्षानुवर्षे तेच उमेदवार उभे राहात असल्याने नव्यांना संधी मिळत नाही. ग्रामपंचायतीपासून निवडणूक रिंगणात उभे राहणारे पुढे आमदार, खासदार होण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, याठिकाणी चक्क उलटा प्रवास सुरू असून, एक शेवटची संधी द्या म्हणत अनेकांनी बस्तान मांडले आहे. तर काहीजण पुढच्यावेळी दुसऱ्याला संधी देऊ, असा शब्द देऊनही पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे नव्याने निवडणूक लढविणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. त्यातच वरिष्ठ स्तरावर नेहमीच्याच चेहऱ्यांना संधी दिली जात असल्याने नेमके काय गौडबंगाल आहे, याची चर्चा रंगत आहे. गेली अनेक वर्षे ग्रामपंचायत निवडणुकीला आपली खोतकी समजणाऱ्यांना आता तरी थांबा म्हणण्याची वेळ मतदारांवर आली आहे.

...तर बहिष्कार टाकू

ग्रामपंचायत हद्दीतील एका प्रभागात शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र, गेल्या १५ वर्षात येथील स्थानिकांना संधी दिलेली नाही. यावेळी येथील ग्रामस्थांनी स्थानिकच उमेदवार हवा, असे सांगितले आहे. गावातील उमेदवार न दिल्यास निवडणुकीवरच बहिष्कार टाकू, असा इशारा दिला आहे.

केवळ स्वत:च्या फायद्यासाठीच सदस्यत्व

ग्रामपंचायतीचा सदस्य होऊन ग्रामपंचायतीच्या निधीतून आपली पोळी भाजून घेण्याचा काहींना सपाटाच लावला आहे. त्यामुळे निवडणुकीत आपल्यालाच तिकीट मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अजून किती वर्ष संधी द्यायची, असा प्रश्न करत त्याच प्रभागात अन्य एकाने उमेदवारी मागितल्याने वादाची ठिणगी पडली आहे.

Web Title: Voters are fed up with the last chance, ignoring the new ones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.