मतदारांच्या दारी, सुरू इच्छुकांची वारी

By admin | Published: November 1, 2016 11:44 PM2016-11-01T23:44:50+5:302016-11-01T23:44:50+5:30

जिल्हा परिषद, पंचायत समिती : सेना, भाजप, मनसेचे उमेदवार जोमात, दोन्ही काँग्रेस थंड

Voters voter, willing to start the campaign | मतदारांच्या दारी, सुरू इच्छुकांची वारी

मतदारांच्या दारी, सुरू इच्छुकांची वारी

Next

लांजा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर शिवसेनेतील इच्छुकांनी आपले अर्ज पक्षाकडे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. भाजप व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी गावागावात जाऊन मतदारांशी हितगूज साधत आहेत. मात्र, काँग्रेस - राष्ट्रवादीमध्ये वातावरण थंड असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रामवस्था निर्माण झाली आहे.
पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर सत्ता असणाऱ्या शिवसेनेकडे इच्छुकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली आहे. काही कार्यकर्त्यांनी आपण इच्छुक असल्याचे अर्ज काही दिवसांपूर्वीच दिले आहेत. शिवसेनेत इच्छुकांची गर्दी होत असल्याने उमेदवारी कोणाला द्यायची आणि कोणाला डावलायचे याबाबतचा निर्णय घेताना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे हा निर्णय केवळ पक्षप्रमुखच घेऊ शकतात. शिवसेनेत पक्षाचा ‘आदेश’ पाळला जातो. त्यामुळे उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, हे आता सांगणे कठीण असले तरी इच्छुक उमेदवार आपल्याला संधी मिळण्याच्या दृष्टीने वरिष्ठांची मनधरणी करत आहेत. त्यामुळे इच्छुकांमध्ये चढाओढ लागलेली आहे.
भाजप व मनसे यांनीही या निवडणुकीत आपली ताकद आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष यशवंत वाकडे, अनुसूचित सेलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर तथा भाई जाधव यांनी लांजा तालुक्यात दौरे करून आपले मतदार वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच कुणबी समाजाचे नेते सीताराम सांडम यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपला याचा मोठा फायदा होणार आहे.
सध्यातरी भाजप नेते सर्व जागांवर निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने हालचाल करत आहे. मात्र, युती झाली तर आपला गण व गटामध्ये मोठी ताकद असलेल्या भागातच उमेदवारीची मागणी करणार असल्याचे कळते. कोणत्याही प्रकारे दगा फटका होऊ नये, यासाठी भाजप सर्वच जागांवर उमेदवार देणार असल्याचे समजते.
लांजात मनसेची ताकद कमी आहे. मात्र, आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर मनसेचे तालुकाध्यक्ष प्रभाकर टाळे, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ देवधेकर यांनी गावागावातील मनसेच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन जनसंपर्क वाढवण्याकडे अधिक लक्ष दिले आहे. कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. मोजक्याच ठिकाणी उमेदवार देऊन त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न मनसेतर्फे केला जाणार आहे.
काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार हे निश्चित असल्याचे आपल्या वाट्याला कोणता गण वा गट येतो, याकडे इच्छुकांचे लक्ष आहे. मात्र, दोन्ही पक्षांकडून अद्याप कोणतीही हालचाल सुरू नसल्याने कार्यकर्ते नाराज झालेले दिसून
येतात.
इंदिरा काँग्रेसचे तालुका नेतृत्व अग्रेसर नसल्याने कार्यकर्तेही थंड आहेत. गेल्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसने शिवसेनेला चांगलीच टक्कर दिली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी नसल्याने अवघ्या काही मतांनी सत्ता गमवावी लागली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची आघाडी असती तर आघाडीला चांगले यश मिळाले असते. मात्र, दोन्ही पक्षांची ताकद आजमावण्याच्या नादात झालेल्या पराभवाचे शल्य काँग्रेस - राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत झालेली चूक सुधारण्याची एक संधी दोन्ही पक्षांकडे आली आहे.
आरक्षण पडल्यानंतर निवडणुकीची गणिते सुरु झाली आहेत. परंतु काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवार कोण, याची चाचपणी केली नसल्याने ऐनवेळी उमेदवार जाहीर केले तर घोळ होण्याची शक्यता आहे. उमेदवार प्रचारासाठी आपल्या गणात व गटात एवढ्या कमी कालावधीत कधी पोहोचणार, याचाही विचार होणे गरजेचे आहे.
सध्या तरी दोन्ही काँग्रेसकडे संभाव्य उमेदवारांची यादी व निवडणुकीची व्यूहरचना केलेली नसल्याने दोन्ही काँग्रेसमध्ये वातावरण शांत आहे. (प्रतिनिधी)
भास्कर जाधवांना डावलल्याने कार्यकर्ते बुचकाळ्यात
निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये कोणतीही राजकीय हालचाल अद्याप सुरु झालेली दिसून येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित यशवंतराव हे लांजा तालुका राष्ट्रवादीचा कारभार मुंबईहून हाकत असल्याने कार्यकर्त्यांना वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन मिळत नाही. त्यामध्ये कोकणचे नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, ते राष्ट्रवादीचे नेते, आमदार भास्कर जाधव यांना पक्षाने डावलल्याने अनेक कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
 

Web Title: Voters voter, willing to start the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.