चुरशीच्या ठरलेल्या दापोली नगरपंचायत निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 11:44 PM2021-12-21T23:44:48+5:302021-12-21T23:45:14+5:30
दोन नेत्यांतील वाद चव्हाट्यावर आल्याने हाय व्होल्टेज प्रचार सुरु झाला होता. यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, दापोली नगरपंचायत निवडणुकीत कमी मतदान झाले.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतनिवडणूक अतिशय चुरशीची बनली होती. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. दोन नेत्यांतील वाद चव्हाट्यावर आल्याने हाय व्होल्टेज प्रचार सुरु झाला होता. यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, दापोली नगरपंचायत निवडणुकीत कमी मतदान झाले. यामुळे या हाय होल्टेज प्रचाराचा मतदानावर परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. नगरपंचायत निवडणुकीत आजपर्यंतचे सर्वात कमी म्हणजे 66.97 टक्केच मतदान झाले आहे.
नगरपंचायत निवडणूक 2021 वेळी प्रभाग 10 शिवाजीनगर येथे सर्वात कमी 49 टक्के मतदान झाले आहे. तर शहरातील प्रभाग क्रमांक सात खंबाळे येथे सर्वाधिक 78 टक्के मतदान झाले आहे. परंतु इतर केंद्रावर मात्र मतदान कमी झाल्याने दापोली नगरपंचायतीच्या आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वात कमी मतदान म्हणजे 65% मतदान झाले आहे. यामुळे दापोली नगरपंचायतीच्या तेरा प्रभागासाठी झालेल्या निवडणुकीत कमी मतदानाचा कोणाला फटका बसतो व कोणाचा फायदा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दापोली नगरपंचायत 8990 पैकी 6022 एवढे मतदान झाले असून पुरुष 4561 तर स्त्री मतदार 4229 मतदानाचा हक्क बजावला आहे.
दापोली नगरपंचायत निवडणुकीत प्रचाराचा जोरदार धुरळा उडाल्याने मतदानाचा टक्का वाढेल, असे वाटत होते. परंतु केवळ 66% मतदान झाल्याने दापोली नगरपंचायत निवडणुकीत कोणाचे गणिते बिघडणार व कोणाला फायदा होणार येत्या 19 जानेवारीला होणाऱ्या मतमोजणी तूनच स्पष्ट होईल. परंतु सध्या तरी निवडणूक शांततेत पार पडली असून 43 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीतमध्ये बंद झाले आहे.