रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बजावला मतदान हक्क
By शोभना कांबळे | Published: May 7, 2024 10:24 AM2024-05-07T10:24:23+5:302024-05-07T10:25:58+5:30
शहरातील रा. भा. शिर्के प्रशाला येथील मतदान केंद्रावर एम देवेंदर सिंह यांनी रांगेत उभे राहून मतदान केले. त्यांनतर त्यांनी मतदान केंद्रावर असलेल्या फलकावर ‘मी मतदान केले.
रत्नागिरी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवार, दि. ७ मे रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील एकूण १९४२ मतदान केंद्रावर सुरू झाले. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा रत्नागिरी -सिंदुधुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
शहरातील रा. भा. शिर्के प्रशाला येथील मतदान केंद्रावर एम देवेंदर सिंह यांनी रांगेत उभे राहून मतदान केले. त्यांनतर त्यांनी मतदान केंद्रावर असलेल्या फलकावर ‘मी मतदान केले. तुम्हीही करा’ या संदेशावर स्वाक्षरीही केली. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्रमांक ५ परटवणे येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पत्नी सौम्यश्री यांनी रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र १५ दामले हायस्कूल येथील मतदान केंद्रावर रांगेतून आपले मतदान केले. अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, राहूल गायकवाड, मारूती बोरकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे तसेच अन्य अधिकारी यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पहाटे ५ वाजता संवाद साधून आज होणाऱ्या मतदान प्रक्रियेबाबत सर्व सहायक निवडणूक अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.