वाडीबेलदार आजही डोलीतच
By Admin | Published: December 1, 2014 09:30 PM2014-12-01T21:30:07+5:302014-12-02T00:31:07+5:30
दळणवळणाचे कोणतेही साधन नसलेल्या वाडीबेलदार येथील ग्रामस्थांच्या नशिबी आजही डोलीचा वापर कायम आहे़
खेड : खेड तालुक्यातील वाडीबेलदार येथील ग्रामस्थांची पायपीट आजही सुरूच आहे. पाणी पुरवठ्यासह इतर दैनंदिन मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या ग्रामस्थांची स्वातंत्र्यानंतर आजही परवड सुरू आहे. बँक, पोस्ट आॅफीस आणि वैद्यकीय सेवेसाठी येथील लोकांना ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या तळे येथील या सुविधांचा लाभ घ्यावा लागत आहे. दळणवळणाचे कोणतेही साधन नसलेल्या वाडीबेलदार येथील ग्रामस्थांच्या नशिबी आजही डोलीचा वापर कायम आहे़
वाडीबेलदार हे सह्याद्रीच्या कपारीत वसलेले गाव आहे. जेमतेम २५० लोकवस्ती असलेले हे गाव़ महिपतगडाच्या पायथ्याशी वसलेले आहे. वाडीबेलदार, सुमारगड आणि महिपतगड हे छत्रपतींच्या पराक्रमांच्या आठवणींना उजाळा देणारे गड इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत़. याच महिपतगडाच्या पायथ्याशी असलेले वाडीबेलदार हे गाव. गावापासून महिपतगड १४०० मीटर उंचीवर आहे़ गुरे-ढोरे नेण्यासाठी डोंगरदऱ्यातूनच १२ किलोमीटरची पायपीट करावी लागते. इतके अंतर पायपीट केल्याशिवाय कोणतीही सुविधा मिळत नाही. वाहतुकीची कोणतीही साधने गावात नसल्याने अनेक आव्हानाना गावकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.
गेली अनेक वर्षे ही स्थिती असून, शासन दरबारी या वस्तीला अद्याप न्याय मिळालेला नाही. तेथील ग्रामस्थांना सहा किलोमीटर अंतरावरील जंगलमय भाग कापून तळे येथे जावे लागते. पाणीदेखील आठ दिवसातून एकदा उपलब्ध होत आहे़ येथील सेवानिवृत्तांना बँकेतील कामांसाठी तळे येथेच जावे लागते. येथे रहदारीसाठी डोली हे एकमेव साधन असून, तीच प्रथा गेले अनेक वर्षे सुरू आहे. या गावातील रस्त्यासाठी तीन कोटी रूपये मंजूर झाले आहेत.
वाडीबेलदार गावापासून पारेश्वर (महिपतगड) स्थळापर्यंत १२ किलोमीटरचा रस्ता मंजूर करण्यात आला आहे़ याकरिता सुमारे ३ कोटी रूपये मंजूरही झाले आहेत. हे काम गेल्या आता पावसाळ्यानंतर सुरू होणार होते़ आता दुसरा पावसाळा संपला तरीही रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही. खेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन उपअभियंता कुयबा यांनी ही माहिती दिली होती़
वाडीबेलदार गावापासून पारेश्वर (महिपतगड) स्थळापर्यंतचा बारा किलोमीटर रस्ता मंजूर करण्यात करण्यात आला आहे़ मात्र, हे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार असल्याची घोषणा हवेत विरली आहे. गेल्या अनेक वर्षांची मागणी असून, आता काही वर्षांनंतर पुन्हा रस्ता होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली होती. सध्या खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ही सोय महत्त्वाची असतानाही सरकारदरबारी याबाबत गांभिर्याने घेतले जात नाही. आता सरकार बदलले आहे. या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
वाडीबेलदारच्या वृध्दांची परवड, रस्ते नाहीत, पाणीही नाही. ८ किलोमीटरची पायपीट.
खेड तालुक्याची स्थिती.
वाडीबेलदार ग्रामस्थांची पायपीट.
दुर्गम भागातील रस्ता दुरूस्तीसाठी निधीची आवश्यकता.