वायकर पुन्हा एकदा जन्मभूमीत...
By admin | Published: December 26, 2014 11:35 PM2014-12-26T23:35:08+5:302014-12-26T23:45:43+5:30
अखेर चर्चेला पूर्णविराम...
रत्नागिरी : जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झालेले सेनेचे राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची जन्मभूमी रत्नागिरी जिल्हा असून, कर्मभूमी मुंबई आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याशी नाळ जोडलेल्या व्यक्तीचीच पालकमंत्रीपदी निवड झाल्याने जिल्हावासियांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मंत्री रामदास कदम यांच्या खेड या बालेकिल्ल्यातीलच शिलेदारास पक्षप्रमुखांनी जिल्ह्याचे पालकत्व दिल्याने वायकर यांना त्यांची वेगळी छाप जिल्ह्यावर निर्माण करावी लागणार आहे.
पालकमंत्री वायकर यांचा जन्म संगमेश्वर तालुक्यातला. त्यानंतर ते खेड तालुक्यातील शिव गावी त्यांच्या मामाकडे राहात असत. त्यानंतर निगडे गावात घर बांधून त्यांनी शेतीही केली. सध्या उधळे गावात त्यांनी घर बांधले आहे. मुंबईत त्यांनी विज्ञान शाखेतील पदवी प्राप्त केली. त्यानंतर शिवसैनिक म्हणून त्यांनी कामाला सुरूवात केली.
वायकर हे मुंबई पालिकेत चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. शिक्षण समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी तेथे अनेक शैक्षणिक उपक्रम यशस्वीरित्या राबविले होते. प्रतिष्ठेचे स्थायी समिती सभापतीपदही त्यांनी भूषविले. वायकर यांचे वास्तव्य मुंबईत असले तरी ते खेड तालुक्यातील निगडे व उधळे या गावी नेहमीच येतात. तेथील संघटनात्मक व विकासात्मक कामात त्यांचा सहभागही आहे. शिवसेनेने कार्याची दखल घेत त्यांच्याकडे मुंबई उपनगराच्या पूर्व जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सोपविले. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळात वायकर यांना गृह, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आले. आता वायकर यांना रत्नागिरीचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
अखेर चर्चेला पूर्णविराम...
राज्य मंत्रिमंडळात दोन राज्यमंत्रीपदांचा सेनेचा कोटा शिल्लक असल्याने माजी मंत्री उदय सामंत यांना मंत्रीपद मिळेल व तेच जिल्ह्याचे पालकमंत्री होतील, या गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला वायकर यांच्या निवडीमुळे पूर्णविराम मिळाला आहे. सामंत यांच्याबरोबरच जिल्ह्यातील सदानंद चव्हाण, राजन साळवी हे मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते. परंतु एकाला मंत्रीपद दिले की पक्षात गटबाजी वाढेल, या भीतीने पक्षप्रमुखांनी त्यांच्यापेक्षा मूळ रत्नागिरीचे असलेले वायकर यांना पालकमंत्री म्हणून मुंबईतून रत्नागिरीत पाठविल्याची चर्चा सुरू झाली आहे.