वायंगणे ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये अपहार

By admin | Published: June 21, 2017 04:00 PM2017-06-21T16:00:44+5:302017-06-21T16:00:44+5:30

गुन्हा दाखल करण्याची सरपंच, ग्रामस्थांची मागणी

Waingana Gram Panchayat Development Works | वायंगणे ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये अपहार

वायंगणे ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये अपहार

Next

आॅनलाईन लोकमत

देवरूख , दि. २१ : संगमेश्वर तालुक्यातील वायंगणे ग्रामपंचायतीच्या विकासकामात अपहार झाल्याचे सिध्द झाले आहे. अपहाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सरपंच सुरेश घडशी व ग्रामस्थांनी केली आहे. यासाठी सतत पाठपुरावा करण्याबरोबरच उपोषणे करण्यात आली. गटविकास अधिकारी हेच या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी चालढकल करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ग्रामपंचायतीमध्ये सन २०१४-१५ या कालावधीत विकासकामांमध्ये अपहार झाला आहे. रस्ते, पाखाड्या आदी विकासकामांसाठी निधी खर्ची टाकण्यात आला. मात्र, कामे अपुरी असून कागदोपत्री पूर्ण करण्यात आल्याचे घडशी यांनी उघड केले आहे. यातून २ लाख ३६ हजार ८३५ रूपयांचा अपहार झाल्याचे लेखा परीक्षणातून पुढे आले आहे. तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांची कसून चौकशी व्हावी, यासाठी घडशी यांनी लढा उभारला आहे.


पंचायत समिती, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आपले सरकार या माध्यमातून घडशी यांनी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला आहे. आझाद मैदानावर उपोषण करण्यात आले. नुकतेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता. दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात येईल, अशी लेखी हमी दिल्याने घडशी यांनी आत्मदहन स्थगित केले. याही बाबीला वीस दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे.


हे प्रकरण पूर्णत्त्वास नेण्यासाठी घडशी हे गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांच्या दालनात धाव घेत आहेत. मात्र, जाधव यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. अपहार झाला नसल्याचे जाधव वारंवार बोलत असल्याने घडशी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.


दिनांक ९ सप्टेंबर २०१६ रोजी २८ हजार ६२५ रूपये इतकी अपहारापोटी वसुली करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयामध्ये अपहार करणाऱ्यांवर प्रथम फौजदारी गुन्हा दाखल करावा व नंतर वसुली करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र, वायंगणे ग्रामपंचायतीमध्ये अपहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल न करता अपहारापोटी रक्कम कशी काय भरून घेण्यात आली? असा यक्ष प्रश्न घडशी यांनी उपस्थित केला आहे. गटविकास अधिकारी जे. पी. जाधव हेच अपहार नसल्याचे सांगत असतील तर अपहारापोटी रक्कम कशी भरणा करून घेतली, असाही प्रश्न घडशी यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Waingana Gram Panchayat Development Works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.