मान्सूनसाठी आणखी पाच दिवसांची प्रतीक्षा
By admin | Published: June 15, 2016 12:23 AM2016-06-15T00:23:38+5:302016-06-15T00:23:56+5:30
सद्य:स्थितीत कोकणात पाऊस पडत असल्याने भात व नागली रोपवाटिकेतील अपूर्ण पेरणी शेतकऱ्यांनी पूर्ण करावी, असा सल्लाही कृषी आयुक्तालय कार्यालयाने दिला आहे.
रत्नागिरी : कोकणात मुसळधार पाऊस पडत असला तरी हा नियमित मान्सून नाही. नजीकच्या चार ते पाच दिवसांत तरी मान्सून दाखल होण्याची चिन्हे नाहीत, अशी माहिती राज्याच्या कृषी आयुक्तालय कार्यालयानेच हवामान खात्याचा हवाला देत प्रसिद्धीस दिली आहे. मान्सूनच्या आगमनासाठी आणखी पाच दिवसांनंतर कोकणात अनुकूल स्थिती असेल, असे कृषी आयुक्तालय कार्यालयाने म्हटले आहे.गेले तीन दिवस रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुुरू आहे. मात्र, हा पाऊस मान्सूनपूर्व असल्याचे हवामान खात्याने यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे सध्या पाऊस पडत असला तरी मान्सून दाखल केव्हा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.याबाबत पुण्याच्या कृषी आयुक्तालयाने हवामान खात्याचा हवाला देऊन पत्रक जारी केले असून, त्यानुसार पाच दिवसांनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती असेल. सद्य:स्थितीत कोकणात पाऊस पडत असल्याने भात व नागली रोपवाटिकेतील अपूर्ण पेरणी शेतकऱ्यांनी पूर्ण करावी, असा सल्लाही कृषी आयुक्तालय कार्यालयाने दिला आहे. (प्रतिनिधी)