चौपदरीकरण पूर्ण होण्यासाठी डिसेंबर २०२२ ची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 06:14 PM2021-01-11T18:14:46+5:302021-01-11T18:19:35+5:30
Highway Ratnagiri- मुंबई-गोवा महामार्गावर आरवली ते वाकेड या सुमारे ९१ किलोमीटर काम बराच काळ रखडले आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होण्यास आता डिसेंबर २०२२ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभा खासदार सुरेश प्रभू यांना याबाबतची माहिती एका पत्रातून दिली आहे.
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आरवली ते वाकेड या सुमारे ९१ किलोमीटर काम बराच काळ रखडले आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होण्यास आता डिसेंबर २०२२ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभा खासदार सुरेश प्रभू यांना याबाबतची माहिती एका पत्रातून दिली आहे.
महामार्गाच्या सद्य:स्थितीबाबत खासदार प्रभू यांनी माहिती विचारली होती. मुंबई ते गोवा या ४५० किलोमीटर महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेली तीन वर्षे सुरू आहे. त्यातील आरवली (संगमेश्वर) ते वाकेड (लांजा) या ९१ किलोमीटर मार्गाचे काम बराच काळ रखडले आहे. यातील आरवली ते कांटे या भागात ८.६१ टक्के, तर कांटे ते वाकेड या भागात १२ टक्के इतकेच काम तीन वर्षांत झाले आहे. हे काम पूर्ण होण्यास डिसेंबर २०२२ उजाडणार असल्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
४५० किलोमीटर मार्गाच्या रुंदीकरणापैकी २३० किलोमीटर मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. आरवली ते वाकेड या दरम्यानचे काम डिसेंबर २०२२ पर्यंत संपविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असेही गडकरी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. या कामाचा पाठपुरावा आपण करीत आहोत, असे खासदार प्रभू यांनी सांगितले.
मार्ग अंतर कामाचे टक्के
- पनवेल ते इंदापूर ८४ ८६.१४
- इंदापूर ते वाडापळे २४.४३० २६.२८
- वीर ते भोगाव खुर्द ३९.५७० ४५.६९
- भोगाव खुर्द ते खवटी १३.६०० ३३.२४
- कशेडी ते परशुराम घाट ४३.८०० ८०.००
- परशुराम घाट ते आरवली ३५.९०० २४.००
- आरवली ते कांटे ४०.००० ८.६१
- कांटे ते वाकेड ५०.९०० १२.००
- वाकेड ते तळगाव ३५.००० ८५.६
- तळगाव ते कलमठ ३८.८३० ९२.००
- कलमठ ते झाराप ४४.१४० ४१.२०