दोन मिनिटांच्या प्रवासासाठी तासाभराची होतेय प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 12:59 PM2021-02-15T12:59:39+5:302021-02-15T13:01:22+5:30
Pwd Bridge Ratnagiri- मंडणगड तालुक्यातील आंबेत पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून म्हाप्रळ-आंबेत रो-रो सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आंबेत ते म्हाप्रळ या सुमारे २०० ते ३०० मीटरच्या प्रवासाकरिता प्रवाशांना तासाभराची प्रतीक्षा करावी लागत आहे.
मंडणगड : तालुक्यातील आंबेत पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून म्हाप्रळ-आंबेत रो-रो सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आंबेत ते म्हाप्रळ या सुमारे २०० ते ३०० मीटरच्या प्रवासाकरिता प्रवाशांना तासाभराची प्रतीक्षा करावी लागत आहे.
आंबेत पुलाच्या दुरूस्ती कामासाठी दिनांक १० फेब्रुवारीपासून पूल सर्वच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पूल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून सुमारे ९० लाख रुपये खर्च करून फेरीबोट (रो-रो) सेवा सुरू करण्यात आली आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात मंडणगड, दापोली याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे सुरुवातीच्या दोन दिवसातच या रो-रो सेवेवर अतिरिक्त भार पडला. तासाभराच्या प्रतीक्षेनंतर प्रवाशांचा क्रमांक येत होता. त्यामुळे अनेकांना प्रवासासाठी तिष्ठतच राहावे लागले होते. पर्यटकांचा वाढता ओघ पाहता आणि एका बोटीवर भार येत असल्याने रो-रो व्यवस्थापनाने आणखी एक बोट वाहतुकीसाठी आणली आहे.
प्रवासासाठी आर्थिक भुर्दंड
पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद केल्याने नियमित आंबेत, गोरेगाव, माणगाव याठिकाणी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे म्हाप्रळ येथील ग्रामस्थांनी रो-रो सेवा स्थानिकांसाठी माफ करावी, अशी मागणी केली आहे.
छोटे उद्योग सुरू
फेरीबोट सुरू झाल्याने म्हाप्रळ परिसरातील ग्रामस्थांनी प्रवाशांच्या सोयीसाठी पाणी, अल्पोपहार यासारखे छोटे उद्योग सुरू केले आहेत. त्यातून रोजगार उपलब्ध करण्याची संधी अनेकांनी साधली आहे.