कामे पूर्ण होऊनही उद्घाटनाची प्रतीक्षाच
By admin | Published: August 29, 2014 10:21 PM2014-08-29T22:21:30+5:302014-08-29T23:10:44+5:30
सुविधा नाहीत : ३० अंगणवाड्यांच्या इमारती नामधारी
रहिम दलाल रत्नागिरी/ जिल्ह्यातील ३० अंगणवाड्यांच्या इमारतींची कामे पूर्ण होऊनही त्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. वीज कनेक्शन व पाणी कनेक्शन नसल्याने या अंगणवाड्यांच्या इमारती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत़
जिल्ह्यात २२६२ अंगणवाड्या मंजूर आहेत़ त्यापैकी १३१२ अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती आहेत़, तर ९५० अंगणवाड्यांसाठी स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत़ ग्रामीण भागामध्ये अंगणवाड्यांना गावकऱ्यांकडून जमीन मिळणे फार कठीण झाले आहे़ ग्रामीण भागातही जमिनीचे भाव वधारले आहेत़ त्यामुळे कोणीही जमीनमालक मोफत जागा देण्यास तयार होत नाही़ या अंगणवाड्यांतील मुले शाळा, मंदिरे आणि घरांच्या ओटीचा आसरा घेतात़ त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत तर इमारती नसल्याने त्या अंगणवाडी सेविकांना बालकांसाठी कसरत करावी लागते़ जिल्हा नियोजन मंडळाकडून अंगणवाड्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात येतो़ मात्र, अंगणवाड्यांसाठी जागा मिळत नसल्याने हा निधी खर्चाविना पडून राहात असल्याने प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण होत आहे़
जिल्हा वार्षिक योजनेतून ३ कोटी ८२ लाख ५ हजार रुपये देण्यात आले. त्यातून ४० अंगणवाड्यांची बांधकामे करण्यात आली़ त्यानंतर अंगणवाड्यांच्या इमारतीसाठी ६० प्रस्ताव जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडे आले होते़ त्यापैकी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ४१ अंगणवाड्यांसाठी २ कोटी ७६ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे़
ग्रामीण भागातील ४० अंगणवाड्यांच्या इमारतींची बांधकामे पूर्ण झाली आहेत़ मात्र, ही बांधकामे पूर्ण असतानाही त्यामध्ये अंगणवाड्या अजूनही सुरु करण्यात आलेल्या नाहीत़ कारण इमारती पूर्ण असल्या तरी त्यामध्ये आवश्यक असलेली बाब म्हणजे वीज आणि पाण्याची सोय अजूनही करण्यात आलेली नाही़ या इमारतींना वीजजोडणी आणि नळ कनेक्शन जोडण्याची आवश्यकता आहे़
त्यामुळे या अंगणवाड्यांच्या इमारती उद्घाटनाविना बंद ठेवण्यात आल्या आहेत़ त्याबाबत मागील स्थायी समितीच्या सभेतही या विषयी जोरदार चर्चा करण्यात आली होती़ या इमारती डिसेंबर, २०१४ पूर्वी महिला व बालकल्याण विभागाकडे हस्तांतरित कराव्या, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत़