पाटी पेन्सीलची प्रतीक्षा!
By admin | Published: November 11, 2016 10:31 PM2016-11-11T22:31:28+5:302016-11-11T22:31:28+5:30
संगमेश्वर तालुका : गोठणेच्या पुनर्वसनानंतरही समस्या कायम
देवरूख : सह्याद्री पर्वतरांगांवर वसलेल्या गोठणे गावाचे पुनर्वसन शासनाने केले आहे. हातीव गावठाणमध्ये पुनर्वसन झाल्यानंतरही त्यांच्या समस्या कायम राहिल्या. गावात १५ मुले असूनही साधी अंगणवाडी या बालकांना उपलब्ध नसल्याने शिक्षणाचा श्रीगणेशा करायचा कुठून असा प्रश्न पडला आहे.
दोन वर्षांपूर्वी गोठणे गावचे पुनर्वसन करण्यात आले. यात ९६ कुटुंब कोकणातील हातीव या गावात पुनर्वसित करण्यात आली. विविध प्रकारच्या मागण्यांसाठी शासनाकडे जोर लावल्यावर पाणी, वीज व शाळा अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. मात्र, शाळेची स्वतंत्र इमारत आजही नाही. असे असतानाही शाळा मात्र भरवली जाते. या शाळेत पाच वर्षांवरील बालकांना सक्तीचा म्हणून प्रवेश दिला जातो. त्यामुळे या वयोगटातील मुलांना शिक्षण मिळत आहे.
मात्र, शासनाने अडीच ते पाच वयोगटातील बालकांसाठी अंगणवाडी हा उपक्रम राबविला आहे. यात या बालकांना सकस आहार, त्यांच्या आरोग्याची तपासणी, नियमित औषधोपचार व शिक्षणाचा श्रीगणेशा याच वयात केला जातो. यामुळे अंगणवाडी सुरू करणे येथील बालकांचा हक्क आहे. मात्र, हातीव गावठाणातील पुनर्वसितांना हक्काची अंगणवाडीच नाही. अडीच ते पाच वयोगटातील या गावात तब्बल १५ मुले आहेत. मुलांना शाळेत दाखल करताना वयाची अट असल्याने सक्तीचे म्हणूनही प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश दिला जात नाही.
यामुळे ही बालके मुख्य शिक्षणाचा पाया असलेल्या अंगणवाडीलाच मुकली आहेत. वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे. ज्या वयात मुलांवर संस्कार करून शिक्षणाचा श्रीगणेशा करायचा, त्याच वयात ही मुले इकडेतिकडे फिरत असतात. याला सर्वस्वी शासनच जबाबदार आहे. या बालकांसाठी शासनाने लवकरच अंगणवाडीची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. (प्रतिनिधी)
सोयी सुविधा कुठायंत?
संगमेश्वर तालुक्यातील गोठणे गावाचे पुनर्वसन करताना तेथील ग्रामस्थांना सर्व सोयी सुविधा देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या आश्वासनांचा विसर पडल्याचे चित्र पुनर्वसन झालेल्या गावात दिसत आहे.