पाणीटंचाई असूनही टॅँकरची प्रतीक्षा

By admin | Published: May 9, 2016 12:17 AM2016-05-09T00:17:09+5:302016-05-09T00:48:51+5:30

रत्नागिरी तालुका : विहिरी, तलाव, नद्या, बंधाऱ्यातील पाणी आटले; काजळी नदीचे पात्र कोरडे

Waiting for the tanker despite the water shortage | पाणीटंचाई असूनही टॅँकरची प्रतीक्षा

पाणीटंचाई असूनही टॅँकरची प्रतीक्षा

Next

रहिम दलाल --रत्नागिरी
तालुक्यातील विहिरी, तलाव आणि बंधाऱ्यांमधील पाणी आटल्याने पाण्यावाचून ग्रामस्थांचे हाल सुरू झाले आहेत. हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत असून, अनेक गावांमधील ग्रामस्थांवर टाहो फोडण्याची वेळ आली आहे. मात्र, प्रशासनाच्या टंचाईच्या व्याख्येमुळे टंचाई असताना ग्रामस्थांना पाण्याचा टँकर मिळत नसल्याची वस्तुस्थिती गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
पावसाळ्याच्या दिवसात कितीही पाऊस पडला तरी उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. येथील जमिनीमध्ये पाणी धरुन ठेवण्याची क्षमता नाही. कारण येथील जमिनी जांभ्या दगडाची बनलेली असल्याने पावसाचे पाणी जमिनीवाटे नद्या, नाले, समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे.
गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने यंदा तालुक्यात पाणीटंचाई उद्भवणार हे निश्चित होते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचायत समितीकडून तालुक्याचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला, तो शासनाकडून मंजूरही झालेला आहे. मात्र, हा आराखडा तयार करताना त्यामध्ये विंधन विहिरींचा समावेश करण्यात आलेला नाही. कारण या विहिरींची कामे जिल्हा नियोजन मंडळाकडून घेण्यात येणार आहेत. आराखड्यामध्ये पाणीटंचाई उद्भवणाऱ्या संभाव्य १७ गावांतील ३५ वाड्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये केवळ टंचाईग्रस्तांना टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. मात्र, नळपाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीचे एकही काम आराखड्यामध्ये घेण्यात आलेले नाही. त्यामुळे तालुक्यात एकही नळपाणी पुरवठा योजना नादुरुस्त नाही, हे विशेष आहे.
रत्नागिरी शहरासह तालुक्यामध्ये अद्याप पाणीटंचाई सुरु झालेली नसल्याचे प्रशासनाकडून शासनाच्या टंचाईच्या निकषानुसार सांगण्यात येत आहे. मात्र, वस्तुस्थिती फार वेगळी आहे. आज अनेक गावांतील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. तालुक्यात साखरतर, खेडशी, फणसोप, टिके, तरवळ बौध्दवाडी या गावांतील लोकांनी पंचायत समितीकडे पाण्याच्या टँकरची मागणी केलेली आहे. मात्र, प्रशासनाकडून टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नसल्याने लोकांवर पाणी, पाणी करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने तालुक्यातील टंचाईग्रस्तांसाठी दोन टँकर अधिग्रहण केले आहेत.
हरचिरी मार्गावर असलेल्या टिके गावात पाणीटंचाई सुरू झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी लोकांचे हाल होत आहेत. येथील विहिरी भरण्यासाठी ग्रामस्थांना आठवडाभर प्रतीक्षा करावी लागत आहे. आठवडाभराच्या कालावधीमध्ये विहीर पाण्याने भरल्यानंतर लोकांना पाणी मिळते. टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी येथील लोकांनी १५ दिवसांपूर्वीच पंचायत समितीकडे केली आहे. मात्र, टंचाईच्या कक्षेत हे गाव बसत नसल्याने जिल्हा प्रशासन या गावाला टँकरच्या पाण्याचा पुरवठा करु शकत नसल्याने लोकांच्या डोळ्यातून पाणी येण्याची वेळ आली आहे.
शहराजवळ असलेल्या साखरतर गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्याने लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून येथे नळपाणी योजना राबवूनही आज तेथील लोकांना पाणी मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. लोकांना टेम्पो, टँकरने पाणी मागवावे लागत आहे. त्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात. पाणी विकत घ्यावे लागत असले तरी हे किती दिवस चालणार, असा प्रश्न लोकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
निरूळ गावातील ठीकवाडी आणि लावगणवाडीला पाण्याची मोठी समस्या जाणवत आहे. या गावातून काजळी नदी जाते. मात्र, ही नदीही आटली आहे. या नदीवर लोकांनी बंधारे घातले होते. काजळी नदीचे पाणी आटल्याने संपूर्ण भाग ओसाड असल्याचे चित्र दिसत आहे. या नदीचे पाणी आटल्याने जनावरानाही पाणी मिळत नसल्याने त्यांची तडफड सुरु आहे. या वाड्यांमधील लोकांनी पिण्याच्या पाण्यासाठी आटलेल्या नदीतील झऱ्यालगत खड्डे खणून पाणी साठवले जाते. हे पाणी वाडग्याने खरवडून कळशी, हंडे भरून घरी आणले जाते. या हंडाभर पाण्यासाठीही महिलांची गर्दी केलेली असते. लावगणवाडीला विहीर मंजूर करुन ती खोदाईही करण्यात आली होती. मंजूर असलेल्या अनुदानातून विहिरीची खोदाई करण्यात आली होती. या विहिरीला पाणी लागलेले नाही. ही विहीर आणखी खोल खोदली असती तर पाणीही लागले असते. मात्र, मंजूर खर्चापेक्षा जास्त खर्च करू शकत नसल्याने या विहिरीचे काम बंद करण्यात आले. त्यानंतर ही विहीर पावसाळ्यात येणाऱ्या नदीच्या गाळाने ती बुजून गेली.

Web Title: Waiting for the tanker despite the water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.