पडेल आरोग्य केंद्राची ग्रामीण रुग्णालयाकडे वाटचाल
By admin | Published: March 4, 2015 10:17 PM2015-03-04T22:17:37+5:302015-03-04T23:44:59+5:30
शासकीय पुरस्काराने सन्मानित : रसोईघर, पेपरलेस सुविधा असणारे राज्यातील पहिलेच केंद्र
अयोध्याप्रसाद गावकर - पुरळ डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराने तीनवेळा सन्मानित पडेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची ग्रामीण रूग्णालयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. एचपी रसोईघर ही संकल्पना राबविणारे हे राज्यातील एकमेव आरोग्य केंद्र आहे. याशिवाय हे आरोग्यकेंद्र राज्यातील पहिलेच पेपरलेस आरोग्यकेंद्र ठरलेले आहे.देवगड तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी पडेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे सुसज्ज इमारतीसहीत अनेक सुविधांनीयुक्त असलेले जिल्ह्यामधील एकमेव आरोग्य केंद्र आहे. या केंद्रांतर्गत १९ गावे येतात. या व्यतिरिक्त मोंड प्राथमिक आरोग्य केंद्रातीलही रूग्ण याच केंद्रात उपचारासाठी येतात. शेजारील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील अनेक गावांमधील रूग्णही याच केंद्रामध्येच उपचारासाठी येतात. प्रतिदिनी आंतर व बाह्यरूग्ण मिळून सुमारे १०० रूग्णांची येथे तपासणी केली जाते. देवगड तालुका ग्रामीण आरोग्य केंद्रात अवघ्या ८ महिलांची प्रसुती होत असताना पडेलच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र २२ महिलांची प्रसुती झाल्याची नोंद आहे. येथे जुळी तसेच अवघड प्रसुतीसुद्धा या केंद्राचे वैद्यकीय अधिकारी (वर्ग एक) डॉ. उमेश पाटील यांनी केलेल्या आहेत. देवगड ग्रामीण रूग्णालयापेक्षा या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीचे प्रमाण जास्त आहे. पुरूष शस्त्रक्रियेतही जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थी याच आरोग्य केंद्रातील आहेत. या केंद्रातील उत्कृष्टपणे प्रसुती करणाऱ्या अधिपरिचारीका सुमन पाटील आणि आरोग्यसेविका रत्नप्रभा केतकर यांचाही सुरक्षित मातृत्वासाठी राज्यस्तरीय गौरव झाला आहे.यशवंत पंचायतराज मूल्यमापन समितीनेही वेळोवेळी पडेल आरोग्य केंद्राच्या कामकाजाचे कौतुक करून प्रमाणपत्र दिले आहे. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे देवगड तालुक्याचेच सुपूत्र असल्याने या केंद्राला लवकरच ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.