दिल्लीत पाऊल ठेवले अन यशला आकाश ठेंगणे झाले
By admin | Published: July 13, 2014 12:26 AM2014-07-13T00:26:56+5:302014-07-13T00:28:52+5:30
‘लोकमत’च्या ‘संस्काराच्या मोती’ योजनेमुळे प्रथमच विमानाने दिल्लीत जाण्याची संधी
सुभाष कदम ल्ल चिपळूण आकाशात झेपावणारे पक्षी पाहिल्यावर किंवा विमान उडताना पाहणंच कुतुहलचा वाटायचं. पण ‘लोकमत’च्या ‘संस्काराच्या मोती’ योजनेमुळे प्रथमच विमानाने दिल्लीत जाण्याची संधी मिळाली आणि आकाश ठेंगणे झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्ष भेटता आले आणि या विकासपुरुषाला जवळून पहाता आले हे माझे भाग्यच! अशी भरभरून आनंद व्यक्त करणाऱ्या शब्दात चिपळूणच्या यश राजेश गोगावले याने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. येथील सुरेश गद्रे इंग्लिश मिडीयम शाळेच्रा आठवीत शिकणारा यश हा छंदिष्ट विद्यार्थी. आई गृहिणी आणि वडील बाळासाहेब माटे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक. यश एकुलता एक मुलगा असल्याने त्याने शिकावं, मोठं व्हावं, अशी आई-वडिलांची इच्छा असल्याने त्यांनी यशला प्रोत्साहन दिलं. शाळेत लोकमतच्या ‘संस्काराचे मोती’ योजनेची माहिती मिळाल्यावर त्याने त्यात भाग घेतला. शालेय अभ्यास, स्वाध्याय व इतर माहितीसाठी हा प्रकल्प महत्वाचा असल्याने तो त्याने पूर्ण केला. त्या योजनेतून बक्षीस तर मिळालेच पण दिल्लीत जाण्याची संधीही मिळाली. ही संधी आपल्यासाठी अनमोल होती, असं यशनं आवर्जून सांगितलं. मनात कुतूहल होतं. देशाच्या राजधानीत प्रत्यक्ष पंतप्रधानांना भेटणार याचं अप्रूप वाटत होतं. आम्ही त्यांच्या कार्यालयात गेलो आणि भारावलोच! देशाचा विकासपुरुष, ‘अच्छे दिन आएंगे’ असं वचन देणारे नरेंद्र मोदी समोर होते. देशाच्या पंतप्रधानाला प्रथमच एवढ्या जवळून पाहण्याची संधी मला माध्यमिक शाळेत असताना मिळाली, हे भाग्य लोकमतमुळे मला लाभलं, असं तो म्हणाला. मराठीत त्यांनी धीरगंभीर आवाजात नाव, शाळेचे व शहराचे नाव विचारले. मी कृतकृत्य झालो. मनात ‘लोकमत’ला लाख लाख धन्यवाद दिले, असं तो म्हणाला. या भेटीत राष्ट्रपती भवन, संसद भवन, राष्ट्रपिता महात्मा गांधीची समाधीस्थळ राजघाट, इंडिया गेट जवळून पाहिले. ही भेट माझ्यासाठी अवर्णनीय अशीच होती. मी ती केव्हाही विसरणार नाही, असंही यशने सांगितलं. ‘लोकमत’च्या ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेत भाग घेताना एवढं काही मिळेल, असं वाटलं नव्हतं. मला या स्पर्धेतून ज्ञानात भर पडते, हे माहीत होतं, म्हणून या स्पर्धेत मी भाग घेतला. या स्पर्धेमुळे ज्ञान वाढलेच, पण दिल्लीत हवाई सफर करण्याची संधीही साधून आली. खुद्द देशाच्या पंतप्रधानांना जवळून भेटण्याचा आलेला क्षण मी कधीच विसरू शकणार नाही, अशी मनापासूनची प्रांजळ प्रतिक्रिया यशने दिली.