माणुसकीची भिंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:32 AM2021-07-27T04:32:44+5:302021-07-27T04:32:44+5:30

पूर चिपळुणात आला असला तरी आपल्या माणसांच्या मदतीला जिल्हावासीय तसेच मुंबई व अन्य जिल्ह्यातील संस्था, लोकांनी मदतीचा हात पुढे ...

The wall of humanity | माणुसकीची भिंत

माणुसकीची भिंत

Next

पूर चिपळुणात आला असला तरी आपल्या माणसांच्या मदतीला जिल्हावासीय तसेच मुंबई व अन्य जिल्ह्यातील संस्था, लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अनेक संस्था स्वत:हून पूरग्रस्तांसाठी साहित्य वितरीत करत आहेत.

चिपळूण शहर व परिसरातील गावांत पुरामुळे झालेले नुकसान प्रचंड आहे. येथील नागरिकांना उभे करण्याची आवश्यकता आहे. घरात साठवलेले साहित्य वाया गेले असल्याने कित्येकांना ही नासधूस पाहून अश्रू अनावर होत आहेत. घरातील साचलेला चिखल साफ करण्यासाठी त्यांना पाण्याची आवश्यकता आहे. पिण्यासाठी स्वच्छ पाणी गरजेचे आहे. कित्येकांच्या अंगावरील वस्त्र वगळता वर्षानुवर्षे काबाडकष्ट करून जमवलेला संसार पुरामुळे नष्ट झाला आहे. पूरग्रस्तांचे दु:ख मोठे आहे शिवाय जवळून पाहिलेल्या मृत्यूमुळे अजूनही काही मंडळी तणावाखाली आहेत. घर, दुकाने असोत किंवा कार्यालये सर्वत्र साफसफाईला सुरूवात झाली असली तरी एक-एक गोष्टीचे झालेले नुकसान त्यांच्यासाठी वेदनादायी ठरत आहे. शहर व परिसरात संस्था, व्यक्ती, प्रशासन मदतीला पोहोचले असले तरी ग्रामीण भागातील टोकाला असलेल्या पूरग्रस्तांना मदत मिळाली का, याचाही आढावा घेणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. काही संस्था स्वत:हून त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. अनेक संस्थांनी साहित्य, वस्तूरूपी मदत सुरू केली असली तरी कित्येक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी टीम तयार करून पूरग्रस्तांच्या घरातील, गावातील चिखल साफ करण्यासाठी मदत केली जात आहेत. याठिकाणी कुठेही जात-पात-धर्म आडवा आलेला नाही. केवळ ग्रुपच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वत:हून मदतीची तयारी दर्शवत आहेत, हे विशेष. इतकेच नव्हे तर पुरामुळे विजेवरील उपकरणे, पाण्याची वाहिनी, पंप, कपाटे, फर्निचर, काैलारू घरे, घराचे दरवाजे, खिडक्या तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यासाठी वायरमन, सुतार, प्लंबर यांचीसुध्दा आवश्यकता आहे. त्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. वाहन दुरुस्तीसाठी मेकॅनिकल असोसिएशनतर्फे तयारी दर्शविली आहे.

पूरग्रस्तांबाबत प्रत्येकालाच आपुलकी असल्याने त्यांना उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपापल्यापरीने मदत कशी करता येईल, याचाच विचार सुरू आहे. शासनाकडून अद्याप मदतीची घोषणा झालेली नसली तरी माणुसकीचा वर्षाव मात्र सुरू आहे.

Web Title: The wall of humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.