बोटिंग प्रकल्पाला सुविधांची वानवाच
By admin | Published: November 19, 2014 09:19 PM2014-11-19T21:19:20+5:302014-11-20T00:02:16+5:30
गुहागर तालुका : सात वर्षात कोणतेच प्रयत्न नाहीत...
असगोली : गुहागरातील मोडकाआगर येथील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या लघुपाटबंधारे तलावात प्रदूषणविरहीत पर्यटन उद्योग म्हणून विशाल बोटिंग प्रकल्प गेली सात वर्षे सुरु आहे. ग्रामीण भागात येणाऱ्या पर्यटकांसाठी जिल्हा नियोजनातर्फे या ठिकाणी मूलभूत सुविधा शासनाने निर्माण कराव्यात, जेणेकरुन तालुक्याच्या पर्यटन वाढीला चालना मिळेल. यासाठी गुहागर नगरपंचायतीने पर्यटन विकासांतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पर्यटकांतून व्यक्त होत आहे.
मोडकाआगर येथील विशाल बोटिंग प्रकल्पाच्या ठिकाणी पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांच्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. या ठिकाणी पिण्याचे पाणी, गार्डन, गार्डनमधील साहित्य, बसण्याची व्यवस्था, विजेचे दिवे, पेवर ब्लॉक अशी व्यवस्था केल्यास पर्यटकांची सोय होईल. गुहागर समुद्रकिनारी लाखो रुपये खर्चून या सुविधा निर्माण केल्या आहेत. तशाच सुविधा या ठिकाणी निर्माण केल्यास पर्यटन विकासाला चालना मिळेल.
मध्यंतरी गुहागर पर्यटन विकास संस्थेच्या अध्यक्ष उज्ज्वला रहाटे यांनी अध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती रत्नागिरी, नगराध्यक्ष नगरपंचायत गुहागर यांच्याकडे निवेदनाद्वारे या मूलभूत सुविधा निर्माण करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. त्याअनुषंगाने मुख्याधिकारी, नगरपंचायत, गुहागर यांना क वर्ग पर्यटन सन २०१४-१५ अंतर्गत अंदाजपत्रक तयार करुन तातडीने पाठवण्यात यावे, जेणेकरुन या प्रस्तावाच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करणे शक्य होईल, असे पत्र जिल्हा नियोजन समिती, रत्नागिरी यांच्याकडून ३० जुलै २०१४ रोजी देण्यात आले होते.
पर्यटकांना मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी बोटिंग प्रकल्प विकास नियोजनामध्ये सहभाग करुन घ्यावा, अशीही विनंती संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे. याअगोदर २०११-१२ या आर्थिक वर्षात क वर्ग पर्यटन कार्यक्रमांतर्गत अशा पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करणे, कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्यावतीने निधीची मागणी करण्यात आली होती.
तसेच या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे पत्र देण्यात आले होते. परंतु यावर अद्याप कार्यवाही झाली नाही. आता पुन्हा सन २०१४-१५ या वर्षात पुन्हा अंदाजपत्रक तयार करण्याचे पत्र देण्यात आले असल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून देण्यात आली. (वार्ताहर)
गुहागर तालुक्यातील मोडकाआगर येथील तलावात बोटिंगला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.