देवरूखात प्रभागनिहाय देणार लसीकरणाचा काेटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:32 AM2021-05-09T04:32:32+5:302021-05-09T04:32:32+5:30
- आरोग्य विभाग - नगरपंचायत यांच्यात बैठक लाेकमत न्यूज नेटवर्क देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथे लसीकरण केंद्राबाहेर तासनतास ...
- आरोग्य विभाग - नगरपंचायत यांच्यात बैठक
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथे लसीकरण केंद्राबाहेर तासनतास रांगेत उभे राहणाऱ्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. लसीचा पुरवठा झाल्यानंतर प्रभागनिहाय लसीकरणाचा काेटा उपलब्ध करून देण्याचा निर्णय देवरूख तहसील कार्यालयात आराेग्य विभाग व नगरपंचायत यांच्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
लसीकरणाबाबत नागरिकांच्या तक्रारी आणि वाढती गर्दी लक्षात घेऊन लसीकरणाचे नियाेजन करण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि नगर पंचायतचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला नायब तहसीलदार अनिल गोसावी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. सोनावणे, देवरूख नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, नगरसेवक, देवरूख ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. अमरीश आगाशे, देवरुखच नगरपंचायतचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे उपस्थित होते.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनावणे यांनी वाढीव लस पुरवठा देवरुखसाठी मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. लस उपलब्धतेविषयी योग्य वेळेत पूर्वसूचना मिळेल, असे सांगण्यात आले. ग्रामीण रुग्णालय देवरूखतर्फे वय वर्षे ४५ वरील दुसऱ्या डोससाठी ज्यांची दिवसांची पूर्तता झाली आहे अशांची यादी नगरपंचायतीला देण्यात येईल. त्यातील वयाच्या ज्येष्ठतेनुसार प्राधान्यक्रम देऊन प्रभागनिहाय नागरिकांना लस घेण्यासाठी केंद्रावर बोलविण्यात येईल.
नगर पंचायतीमार्फत प्रभागनिहाय असलेले नागरिक कृती दलामार्फत वय वर्षे ४५ वरील सर्व नागरिक यांचा पहिला डोस घ्यायचा आहे. त्यांची नावे घेण्यात येतील, नाव घेताना व्यक्तीचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर व असलेल्या व्याधी अशाप्रकारे माहिती घेण्यात येईल. त्यांना वयाच्या ज्येष्ठतेनुसार प्रभागनिहाय १०० व्यक्तींची पहिली यादी नागरिक कृती दलामार्फत नगरपंचायतीकडून आरोग्य विभागाला देण्यात येईल. लसीच्या उपलब्धतेनुसार प्रभागनिहाय नागरिकांना बोलावून लस देण्यात येईल, असे ठरविण्यात आले तसेच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी देवरूख केंद्राचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण ऑनलाईन पद्धतीनेच होणार असून, फक्त त्याची माहितीही नागरी कृती दलाने जमा करावी असे ठरले. लस पुरवठ्यामध्ये २० टक्के लस ही फ्रंटलाईन वर्करसाठी राखीव ठेवण्याचे ठरले.
देवरुख बाहेरच्या गावातल्या नागरिकांसाठी तालुका आरोग्य विभाग वेगळे नियोजन करून त्यांना लस पुरवेल, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
देवरुखमधील लसीकरणाचे नियोजन प्रभागाचे नागरी कृती दल, नगरसेवक यांच्या अध्यक्षतेखाली करतील आणि नागरिकांना लस घेण्यासाठी सुयोग्य व्यवस्थापन नगरपंचायत देवरुख, संगमेश्वर तालुका आरोग्य विभाग आणि ग्रामीण रुग्णालय देवरुख यांच्यामार्फत करण्यात येईल, असे सर्वानुमते ठरले.