वारकऱ्यांच्या बसला चुकला..अन् जीवाला मुकला!; चिपळूणातील रविंद्र मोरे याचा अपघातात मृत्यू
By संदीप बांद्रे | Published: July 17, 2024 05:20 PM2024-07-17T17:20:23+5:302024-07-17T17:22:31+5:30
रस्त्यावरून जाणाऱ्यांना मदतीची याचना करीत होता. परंतू अर्धातास होऊनही मदत मिळाली नाही
चिपळूण : पाऊले चालती पंढरीची वाट.. सुखी संसाराची सोडूनिया गाठ..अशीच काहीशी परिस्थिती चिपळूणातील एका तरूणाच्या बाबतीत घडली आहे. दरवर्षी आषाढी एकादशी निमीत्त विठूरायाच्या दर्शनासाठी जाणारा तालुक्यातील पेढे मोरेवाडी येथील रविंद्र बाळू मोरे या तरूणावर काळाने घाला घातला. दुचाकी अपघातात आटपाडी दिघंजी येथे मंगळवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला आणि आषाढी वारी पुर्ण न करताच विठूरायाच्या दर्शनाआधीच त्याने जगाचा निरोप घेतला. वारकऱ्यांच्या बसमधून काही कारणात्सव प्रवास चुकला आणि आपल्या जीवाला मुकला.
गेल्या दहा वर्षापासून रविंद्र मोरे हे आषाढी वारीसाठी पंढरपूरला जात आहेत. याहीवर्षी त्याने पंढरपूरला जाण्याची तयारी केली होती. पेढे मोरेवाडी येथील वारकऱ्यांनी पंढरपूरला जाण्यासाठी खासगी बस केली होती. त्यामुळे या लोकांनी रविंद्रला विचारले होते. मात्र त्यावेळी त्यांनी तुम्ही पुढे व्हा मी मागावून येतो, असे सांगितले. त्यानंतर त्याने आपला मित्र सुधीर शांताराम निवाते (३०, पेठमाप, गणेशवाडी चिपळूण) याला सोबत घेऊन दुचाकीने पंढरीचीवारी मंगळवारी सकाळी सुरू केली. त्यासाठी त्याने स्वतः गाडी ताब्यात घेऊन सुमारे २०० किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास केला.
मात्र त्यानंतर त्याने सुधीरला गाडी चालवण्यास दिली. तेथून ५ किलोमिटर अंतरावर दिघंजी येथे पोहोचताच वॅगनार कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये सुधीर हा गाडीजवळच कोसळला. तर रविंद्र मोरे हा रस्त्याबाहेर फेकला गेला. त्यामुळे त्याचे डोके दगडावर आदळले आणि तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर १५ मिनीटे त्याच्या हालचाली जाणवत होत्या. त्याचवेळी निवाते हा रस्त्यावरून जाणाऱ्यांना मदतीची याचना करीत होता. परंतू अर्धातास होऊनही मदत मिळाली नाही. निवाते याच्या दोन्ही पायांना व हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यालाही मार्ग दिसत नव्हता. अशातच काही वारकरी व वाहतूकदार तेथे आले आणि त्यांना सांगलीतील शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत रविंद्र मोरे याची प्राणज्योत मालवली होती.
याचवेळी आधी पंढरीला गेलेल्या गावकऱ्यांना अपघाताची माहिती मिळाली आणि त्याना धक्काच बसला. यानंतर पंढरपूरात असलेले गावकरी माघारी फिरले आणि घटनास्थळी आले. त्याचवेळी पेढे ग्रामस्थ देखील तेथे पोहोचले. रात्री उशिरा रविंद्र मोरे याचा मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी पेढे येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निवाते याला अधिक उपचारासाठी मुंबईत नेण्यात आले आहे. रविंद्र मोरे याच्या या अचानक जाण्याने तालुक्यातील वारकऱ्यासह ग्रामस्थांमधून शोक व्यक्त होत आहे.
मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
रविंद्र मोरे हा उत्तम सुवर्ण कारागिर होता. सोने चांदीचे नक्षीदार दागिणे घडविण्यात त्याचा हातखंडा होता. त्याने २० हून अधिक तरूणांना या व्यवसायात आणून त्यांना कारागिर बनवले. आज ते विविध सुवर्णपेढ्यांमध्ये कौशल्य दाखवत आहेत. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असून घरातील कर्ता पुरूष निघून गेल्याने त्यांच्या संपुर्ण कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे.