रिफायनरी विरोधात आता रत्नागिरी ते सिंधुदुर्ग रास्ता रोको करण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 03:55 PM2018-07-20T15:55:32+5:302018-07-20T15:59:51+5:30
राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात येत्या काही दिवसांत मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीच्या सीमेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदापर्यंत रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राजापूर : तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेतून विरोध केला जात असताना मुख्यमंत्र्यांनी या विरोधाकडे कानाडोळा केला आहे. प्रकल्प विरोधकांनी प्रकल्पाच्या विरोधात एकापाठोपाठ असे आंदोलन सत्र सुरू ठेवले आहे. नागपूर अधिवेशनात धरणे आंदोलन, मुंबईत दादर येथे निदर्शने झाल्यानंतर बुधवारी राजापूर तालुक्यातील डोंगर तिठा येथे मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. येत्या काही दिवसांत मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीच्या सीमेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदापर्यंत रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
येत्या काही दिवसात दखल घेऊन प्रकल्प रद्द न केल्यास काही दिवसात रायगड रत्नागिरी सिमेपासून थेट बांदापर्यंत रास्ता रोको करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. नाणार प्रकल्पाला प्रकल्पग्रस्त जनतेचा कडाडून विरोध होत असताना शासन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाणारबाबत पर्यावरणीय बाबींचा अभ्यास करून समृध्दीप्रमाणे चर्चा करण्याची भाषा करत आहेत. प्रकल्प विरोधकांनी आंदोलन, मोर्चे, निवेदने यांच्या माध्यमातून आपला विरोध शासनापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांना प्रकल्पग्रस्त जनतेचा विरोध दिसत नाही. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात आंदोलनाचे सत्र सुरू करण्यात आले असल्याचे यावेळी प्रकल्पग्रस्तांनी सांगितले.
दरम्यान, प्रथम नागपूर अधिवेशनात धरणे आंदोलन, नंतर मुंबई दादर येथे निदर्शने झाल्यानंतर बुधवारी राजापूर तालुक्यातील डोंगर येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी प्रकल्पाला विरोध माहिती असूनही येथील जनतेसोबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री येणार असे सांगत आहेत. मात्र आता येथील ग्रामस्थांना या प्रकल्पाबाबत चर्चा करण्याची इच्छाच नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. या प्रकल्पाला येथील जनतेचा सुरूवातीपासूनच विरोध आहे व आजही तो कायम आहे. हा प्रकल्प येथून रद्द करण्यात यावा, या एकमेव मागणीशिवाय येथील जनतेची अन्य कोणतीही मागणी नाही. शासनाला हा विरोध कळत नसेल तर भविष्यात प्रकल्पाविरोधात उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी काळे झेंडे फडकावत निषेध केला.
यावेळी रिफायनरीविरोधी शेतकरी, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर कदम, ओंकार प्रभुदेसाई, सचिव भाई सामंत यांच्यासह अन्य पदाधिकारी, सदस्य तसेच शिवसेनेचे नूतन राजापूर तालुका संपर्कप्रमुख व अवजड वाहतूक सेनेचे कोकण विभाग महाराष्ट्र राज्य सचिव दिनेश जैतापकर, राजापूर तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, उपतालुकाप्रमुख, राजापूर सभापती अभिजीत तेली, जिल्हा परिषद सदस्य दरपक नागले आदी सेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक उपस्थित होते.
आता रत्नागिरीपासून बांदापर्यंत रास्ता रोको
येथील प्रकल्पग्रस्तांची प्रकल्प रद्द ही एकच जिद्द आहे. शासनाने या मागणीचा विचार करून प्रकल्प रद्द करावा, अन्यथा येत्या काही दिवसांत मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीच्या सीमेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदापर्यंत रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत विधान परिषदेचे अधिवेशन संपल्यानंतर रास्ता रोकोचे नियोजन व तारीख नक्की केली जाणार असल्याची माहिती अरविंद उर्फ भाई सामंत यांनी दिली.