जिल्ह्यात पाणीटंचाईमध्ये जैसे थे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:31 AM2021-04-16T04:31:25+5:302021-04-16T04:31:25+5:30
रत्नागिरी : मागील आठवड्यामध्ये जिल्ह्यातील ४ गावांतील ५ वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने, येथील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत ...
रत्नागिरी : मागील आठवड्यामध्ये जिल्ह्यातील ४ गावांतील ५ वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने, येथील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. मात्र, चालू आठवड्यामध्ये या टंचाईग्रस्तांमध्ये एकाही गावातील वाडीची भर न पडल्याने पाणीटंचाई जैसे थे आहे.
खेड तालुक्यातील खवटी गावातील खालची धनगरवाडीमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवू लागल्याने, लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. खवटी-खालची धनगरवाडीनंतर आता वरची धरनगरवाडी, आंबवली येथील भिंगारा, लांजा तालुक्यातील चिंचुर्टीमधील धावडेवाडी येथे दरवर्षी भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्वरूपानंदनगर येथील २४ विहिरींचे पाणी दूषित झाल्याने त्यांनाही टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टंचाईग्रस्तांना ३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, तोही अपुरा पडत असल्याची ओरड ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.
दरम्यान, उष्म्यामध्ये प्रचंड वाढ झाल्याने पाण्याची पातळीही खालावली आहे. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त गावे, वाड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, चालू आठवड्यात टंचाईग्रस्त गावे, वाड्यांमध्ये भर पडलेली नाही. त्यामुळे पाणीटंचाई सध्या तरी जैसे थे आहे.