रत्नागिरीत पाकीटमाराची धुलाई, आरोपीला अटक : २०,६०० रुपये हातोहात केले लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 06:28 PM2018-05-30T18:28:10+5:302018-05-30T18:28:10+5:30
रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिर परिसरातील एका दुकानाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीच्या शर्टाच्या खिशातील २०,६०० रुपयांच्या नोटा चंद्रेश राम (२०, रा. इंदोर, मध्यप्रदेश) या पाकिटमाराने हातोहात लंपास केल्या.
रत्नागिरी : शहरातील विठ्ठल मंदिर परिसरातील एका दुकानाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीच्या शर्टाच्या खिशातील २०,६०० रुपयांच्या नोटा चंद्रेश राम (२०, रा. इंदोर, मध्यप्रदेश) या पाकिटमाराने हातोहात लंपास केल्या.
पळून जाताना या पाकीटमाराला नागरिकांनीच पकडले. त्याला चांगलाच प्रसाद देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, या सराईत चोरट्याकडील रोख रक्कम घेऊन त्याचा दुसरा साथीदार पसार झाला. मंगळवारी सकाळी ९.४५ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी चंद्रेशला पोलिसांनी अटक केली.
फिर्यादी वसंत पांडुरंग भिंगार्डे (६६, रा. बंदररोड, रत्नागिरी) हे शहरातील विठ्ठल मंदिरजवळील रजनीकांत या दुकानाजवळ उभे होते. त्यावेळी पाठीमागून आलेला पाकीटमार चंद्रेश याने भिंगार्डे यांच्या उजव्या खांद्यावर नायलॉनची पिशवी ठेवली. त्याचवेळी त्यांच्या शर्टाच्या डाव्या खिशातील २०,६०० रुपयांच्या नोटा लंपास केल्या. त्याचे काही अन्य साथीदारही तेथे होते.
ते रक्कम घेऊन पसार झाले. मात्र, खिशातील पैसे लंपास झाल्याचे भिंगार्डे यांच्या लक्षात आल्याने ते चोर-चोर म्हणून जोरात ओरडले. त्यामुळे पळून जाणाऱ्या पाकीटमार चंद्रेशला तेथील नागरिकांनी पकडून त्याची चांगलीच धुलाई केली. याप्रकरणी पैसे घेऊन पसार झालेल्या तीन संशयितांचा शहर पोलीस शोध घेत असून, चंद्रेशची चौकशी सुरू आहे.