नगर परिषदेकडून कचऱ्याचे व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:22 AM2021-06-22T04:22:02+5:302021-06-22T04:22:02+5:30

चिपळूण : रुग्णालयातील कचरा संबंधितांकडून नियमितपणे नेला जातो. कचऱ्याचे व्यवस्थापन नेमून दिलेल्या ठेकेदाराकडून केले जाते, अशी माहिती कामथे उपजिल्हा ...

Waste management from the city council | नगर परिषदेकडून कचऱ्याचे व्यवस्थापन

नगर परिषदेकडून कचऱ्याचे व्यवस्थापन

Next

चिपळूण : रुग्णालयातील कचरा संबंधितांकडून नियमितपणे नेला जातो. कचऱ्याचे व्यवस्थापन नेमून दिलेल्या ठेकेदाराकडून केले जाते, अशी माहिती कामथे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रघुनाथ भोई यांनी दिली. चिपळूण नगर परिषदेने कचऱ्याचे व्यवस्थापन केले आहे.

उपकेंद्रात होतोय बिघाड

गुहागर : मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर गुहागर शहर आणि परिसरात विजेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. गेले चार दिवस सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. यासाठी ९ महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेले महावितरणचे नवे उपकेंद्र कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे जनतेबरोबरच कर्मचारीही त्रस्त झाले आहेत.

यशस्वीपणे राबविली लसीकरण मोहीम

रत्नागिरी : मजगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामसेवक, कर्मचारी यांनी नियोजनबद्धरीत्या लसीकरणाची मोहीम राबवून नागरिकांची प्रलंबित मागणी पूर्ण केली आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात एकही नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.

गांजा विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल

खेड : तालुक्यातील लवेल दाभिळ नाका येथील हॉटेल समाधाननजीक ५१४ ग्रॅम वजनाचा गांजा आपल्याजवळ बाळगून विक्री केल्याप्रकरणी संशयित इस्तियाक अ. कादीर शहा याला इंडिगो कारसह ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा १७ जून रोजी रात्री ९ वाजता घडला.

लसीचा तुटवडा नाही

गुहागर : लसीकरणाच्या नियोजनाची पद्धती आणि १३ एप्रिलपासून लागू असलेले निर्बंध यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. ही वस्तु:स्थिती आहे. त्याचप्रमाणे गुहागर तालुक्यात लसीचा तुटवडा नाही. आजही ४८० डोस शिल्लक आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

खेड : मुंबईतील दीप जनसेवा समितीच्या माध्यमातून चिवेली येथील साळुंखे परिवाराच्या सहकार्याने व संतोष सावर्डेकर यांच्या पुढाकाराने काडवली-कांगणेवाडी येथील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाबद्दल येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

तत्परतेने डोसची उपलब्धता

जाकादेवी : जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोगय सभापती उदय बने यांच्या तत्परतेने ग्रामीण भागात कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड डोस उपलब्ध करून देण्यात आला. तालुक्यातील बोंड्ये, नारशिंगे, राई गावातील ग्रामस्थ लसीकरण मोहिमेपासून वंचित राहिले होते.

गौण खनिज रॉयल्टीत वाढ होणार

साखरपा : बांधकामासाठी लागणाऱ्या गौण खनिजाच्या राॅयल्टीमध्ये १ जुलैपासून भरघोस वाढ करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कोरोना महामारीमुळे अगोदरच बांधकाम व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यात गौण खनिजाच्या रॉयल्टीतही वाढ केली जाणार असल्याने व्यावसायिक अडचणीत येणार आहेत.

कोरोना तपासणीसाठी ग्रामस्थांचा प्रतिसाद

रत्नागिरी : सध्या जिल्ह्यात कोविड-१९ या आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या आजाराला आळा घालण्यासाठी प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील सर्व ग्रामस्थांची कोविड तपासणी करणे अत्यावश्यक आहे. कोरोना तपासणीसाठी ग्रुप ग्रामपंचायत बोंड्ये-नारशिंगे येथील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

परुळेत आढळले २३ रुग्ण

राजापूर : तालुक्याच्या किनारपट्टीसह लगतच्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे आशादायक चित्र निर्माण झालेले असतानाच पाचलच्या पूर्व भागात कोरोचा धुमाकूळ सुरू आहे. परुळे गावात अँटिजन चाचणीत एकाच दिवशी तब्बल २३ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

वृद्धाश्रमाला मदत

लांजा : तालुक्यातील देवधे येथील अल्फोन्सा वृद्धाश्रमाला आसगे येथील युवकांनी कोरोना काळात या वृद्धांना खाद्यवस्तूंची भेट दिली, तसेच वृद्धाश्रमांसाठी कोरोनापासून काळजी घेण्यासाठी सॅनिटायझर, मास्क आदी वस्तू वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

Web Title: Waste management from the city council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.