रत्नागिरीलगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील निवासी व व्यापारी संकुलांच्या कचऱ्याचे होणार व्यवस्थापन

By शोभना कांबळे | Published: June 22, 2024 02:19 PM2024-06-22T14:19:15+5:302024-06-22T14:19:47+5:30

जिल्हा परिषदेकडून सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरु 

Waste management of residential and commercial complexes in Gram Panchayat area near Ratnagiri will be done | रत्नागिरीलगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील निवासी व व्यापारी संकुलांच्या कचऱ्याचे होणार व्यवस्थापन

रत्नागिरीलगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील निवासी व व्यापारी संकुलांच्या कचऱ्याचे होणार व्यवस्थापन

रत्नागिरी : स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२ अंतगत मार्च २०२५ अखेर रत्नागिरी जिल्हयातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रातील महसूल गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार करुन गावे हागणदारीमुक्त अधिक उत्कृष्ठ करण्याबाबत केंद्र व राज्य शासनाने सुचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने सर्व ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून सुरु झाली आहे.

शहरालगतच्या ग्रामपंचायतींच्या परिक्षेत्रामध्ये निवासी संकुलाचे (अपार्टमेंट) प्रमाण जास्त आहे. घनकचरा व्यवस्थापन सुविधा नसल्याने या निवासी संकुलांमधील कचरा इतरत्र टाकला जात आहे. तसेच ग्रामपंचायतींची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशा शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये निवासी संकुलांची संख्या अधिक असल्याने येथे मोठ्या प्रमाणात घनकचरा तयार होत असल्याचे दिसून आले आहे.

या कचऱ्याचे व्यवस्थापन निवासी संकुलांमध्येच केल्यास सार्वजनिक स्तरावर कचरा व्यवस्थापनाचा भार कमी होईल व एकूणच गावचे घनकचरा व्यवस्थापन करणे देखील सोईचे होईल. त्याकरीता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी तालुक्यातील शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायत शिरगांव, मिरजोळे, पोमेंडी बु., कर्ला, कुवारबांव, नाचणे, खेडशी यांचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात गुरूवारी बैठक झाली.

या बैठकीमध्ये या ७ ग्रामपंचायतीमध्ये कचऱ्याचे ढिगारे सार्वजनिक ठिकाणी असल्याचे निदर्शनात आल्याचे पुजार यांनी सांगून त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याबाबत स्पष्ट केले. त्याकरीता रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे व नाचणे येथील निवासी संकुलांना भेट देऊन तेथील रहिवासी तयार करीत असलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन (कंपोस्टींग) अतिशय उत्तम व चांगल्या प्रतीचे असल्याबाबत अधोरेखित केले. त्या धर्तीवर शहरालगतच्या सर्व ग्रामपंचायतींनी त्यांच्या परिक्षेत्रात असलेल्या सर्व निवासी संकुलांना कचऱ्याचे व्यवस्थापन स्व:खर्चाने त्यांच्या स्तरावर करण्याकरीता प्रेरीत करावे असे आवाहन केले.

सार्वजनिक ठिकाणी जेथे कचरा टाकला जातो अशा सर्व ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांना पावती पुस्तक घेऊन गस्त घालायला लावाी. कचरा उघड्यावर टाकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी. व पोलीस विभागाच्या सहाय्याने कायदेशीर कारवाई करावी, अशा सुचनाही पुजार यांनी दिल्या.

या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, गटविकास अधिकारी जे.पी.जाधव, पी.एन.सुर्वे, पऱ्हाते, शिरधनकर तसेच ७ ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, रत्नागिरी नगर परिघदेचे उप अभियंता अविनाश भोईर तसेच जिल्हा कक्षातील सल्लागार, तज्ञ उपस्थित होते.

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी

ओल्या कचऱ्यासोबत प्लास्टीकचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे ओल्या कचऱ्यासोबतच प्लास्टीक कचऱ्याचे व्यवस्थापन होण्याकरीता ग्रामपंचायत स्तरावर प्लास्टीक बंदी करण्यात यावी. सर्व दुकानात प्लास्टीक पिशव्या वापरण्यावर बंदी करावी. तशा लेखी सुचना सर्व व्यापाऱ्यांना देण्यात याव्यात. ग्रामपंचायत स्तरावर प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती करावी. त्यानंतर प्लास्टीक पिशव्या सापडल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतीने करावी, अशा सुचना यावेळी पुजार यांनी केल्या.

Web Title: Waste management of residential and commercial complexes in Gram Panchayat area near Ratnagiri will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.