लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी पुन्हा उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 05:43 PM2017-11-11T17:43:43+5:302017-11-11T17:57:21+5:30
लोटे-परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले असून, याविरोधात आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याचे सुमारास सीईटीपी नाल्यालगत उघड्यावर सांडपाणी वाहत असल्याचे घाणेखुंट ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.
आवाशी (ता. खेड) ,दि. ११ : लोटे-परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले असून, याविरोधात आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याचे सुमारास सीईटीपी नाल्यालगत उघड्यावर सांडपाणी वाहत असल्याचे घाणेखुंट ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.
संपूर्णपणे रासायनिक स्वरुपाचे कारखाने असलेल्या लोटे-परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्यांमध्ये सांडपाण्यावर प्राथमिक प्रक्रिया करणारे प्लांट कार्यान्वित नाहीत किंवा असले तरी ते सध्या वापरात नाहीत. तसेच कंपन्यांकडून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपीकडून कर आकारण्यात येतो.
बहुधा हा कर वाचवण्यासाठी वा ज्यांच्याकडे असे प्लांट उपलब्ध नाहीत अशा कंपन्यांकडूनच बिनदिक्कतपणे रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडले जात आहे. मात्र, या समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न कधीही एमआयडीसी वा एमपीसीबी करीत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ही समस्या सुटण्याऐवजी जटील होत चालली आहे.
शुक्रवारी सकाळी घाणेखुंट - सुर्वेवाडी येथील भायजाचा पºयात काळे व रसायनमिश्रीत पाणी वाहत असल्याचे सरपंच अंकुश काते, चंदन गवळी, सूरज काते, राजेश चव्हाण, विलास आंब्रे, प्रवीण काते, भूषण काते यांच्या निदर्शनास आले.
पऱ्यापासून हे ग्रामस्थ सीईटीपीलगत असणाऱ्या नाल्याजवळ आले असता, त्यांना पूर्वेकडे असणाऱ्या कंपन्यांच्या दिशेने हे पाणी येत असल्याचे आढळले. त्यानंतर सरपंच अंकुश काते यांनी एमआयडीसी, एमपीसीबी, सीईटीपी व लोटे पोलीस दूरक्षेत्राला माहिती दिली. मात्र, सीईटीपीखेरीज कोणीही हजर झाले नाही.
काही महिन्यांपूर्वी वसाहतीत एमआयडीसीचे सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली एक भरारी पथक पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी नेमकी काय पाहणी केली व काय कारवाई केली? केली असेल तर पुन्हा हे प्रकार सुरू कसे? त्यामुळे हे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरुन संबंधित यंत्रणा व कंपन्यांना याचा जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. अधिकारी व कंपन्यांमध्ये असणाऱ्या साट्यालोट्याचाही लवकरच भांडाफोड करु.
अंकुश काते, सरपंच
मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत मंडणगड येथे असून, मला सरपंच काते यांनी घटनेची कल्पना दिली आहे. मात्र, मी तेथे हजर नसल्याने व उपप्रादेशिक अधिकारी देखील मुंबई येथे बैठकीसाठी गेले असून, इतर कोणीही अधिकारी कार्यालयात नाही. त्यामुळे घटनास्थळी येणे शक्य झाले नाही. मात्र, आता पावसाळा संपला असल्याने जे कोणी हे कृत्य करीत आहेत त्यांचा तपास लावणे शक्य असून, उन्हाळा असल्याने ते तपासणे सोपे जाईल. मी शनिवारी घटनास्थळाला भेट देत सत्य शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे घटनेच्या मुळाशी जाणे शक्य होईल.
एस. बी. मोरे,
प्रदूषण नियंत्रण मंडळ, चिपळूण