खेडात आज जलचेतना परिषद
By Admin | Published: January 16, 2016 11:38 PM2016-01-16T23:38:12+5:302016-01-16T23:42:03+5:30
मुख्यमंत्र्यांची उपस्थिती : नव्या घोषणा होण्याची शक्यता?
खेड : खेड तालुक्यातील महाळुंगे येथे जलचेतना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जगबुडी नदीवरील जलोपासना अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. रविवार, दि. १७ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता हा समारंभ होणार आहे. दरम्यान, जलपोसना अभियानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कोकण हिताचे दृष्टीने काही नव्या घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे़
कोकण भूमी प्रतिष्ठान, हिरवळ प्रतिष्ठान, जलबिरादरी महाराष्ट्र आणि सिंधुरत्न प्रतिष्ठानच्या सहकार्याने संबंध कोकणात हा जलपरिक्रमेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचा शुभारंभ खेड येथील जगबुडी नदीठिकाणी करण्यात येणार आहे. जलक्षेत्रातील जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ आणि मेगॅसेसे पुरस्कारप्राप्त डॉ़ राजेंद्रसिंह हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याबरोबरच पालकमंत्री रवींद्र वायकरही उपस्थित राहणार आहेत. डॉ़ राजेंद्रसिंह यांच्या उपस्थितीत जगबुडी नदीवर नेमके काय करणार, तसेच या जलअभियानामुळे कृषी क्षेत्रात किंवा पिण्याच्या पाण्याबाबत काय उपाययोजना होणार आहेत, याविषयी अनेकांच्या मनात कुतुहल निर्माण झाले आहे़
महाळुंगे या गावात हे अभियान होत असल्याने या मार्गावर असलेल्या अठरा गाव धवडे बांदरी विभागाचा कायापालट होणार आहे़ या अभियानामुळे कोकणातील जलचेतना अभियान यशस्वी होण्यास मदत होणार आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच कृषी क्षेत्रात नवे पर्व यामुळे सुरू होणार आहे़ (प्रतिनिधी)
ेकडेकोट सुरक्षा व्यवस्था
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खेड शहरासह भरणे नाका आणि महाळुंगे दरम्यान १२ किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा तसेच परिसरात आणि कोकण रेल्वे मार्गाच्या परिसरातही सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे़