रत्नागिरी शहरावर पाणीसंकटाचे ढग, आठवड्यातून दोन दिवस पाणी कपातीचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 12:41 PM2024-03-06T12:41:13+5:302024-03-06T12:42:11+5:30
नागरिकांना यापुढे काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागणार
रत्नागिरी : रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या शीळ धरणातीलपाणीसाठा कमी झाल्याने शहरवासीयांना आतापासूनच पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. रत्नागिरी नगर परिषदेने आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना यापुढे काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागणार आहे.
शीळ धरणाची साठवण क्षमता ४.३७१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात २.०८२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. हाच पाणीसाठा सध्या १.८२८ दशलक्ष घनमीटर इतका आहे. शहरात १० हजार नळजोडण्या असून, दररोज रत्नागिरी शहराला १८ ते १९ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जातो. नियमित तेवढाच पाणीपुरवठा सुरू असला तरी आठवड्यातून दोन दिवस कपात केली तरच पाणीसाठा पुरणार आहे.
पाण्याचे योग्य नियोजन झाले नाही तर पावसाळा सुरू होईपर्यंत धरणातील पाणी पुरणे अशक्य आहे. त्यामुळे आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर सोमवारी व गुरुवारी शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार नसल्याने नागरिकांवर पाण्याचा वापर जपून करण्याची वेळ आली आहे.
‘अल-निनो’ या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेचा मान्सूनवर मोठा परिणाम झाल्याने सरासरी पर्जन्यमानापेक्षा गतवर्षी कमी पाऊस झाला. त्यामुळे शीळ धरणात पाणीसाठा कमी आहे. उष्म्यामुळे बाष्पीभवन होत असल्याने पाणीपातळी झपाट्याने घटत आहे. पाणीटंचाईवर मात करताना, मान्सून सुरू होईपर्यंत धरणातील शिल्लक पाणीसाठा पुरविण्याचे आव्हान नगर परिषद प्रशासनासमाेर आहे. पाणी कपातीचे नियोजन झाले नाही तर पावसाळा सुरू होईपर्यंत धरणातील पाणी पुरणे अशक्य आहे.
शीळ धरणामध्ये असलेला शिल्लक पाणीसाठा पावसाळा सुरू होईपर्यंत शहरवासीयांना पुरविण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. म्हणून आता आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच सोमवार आणि गुरुवार असा दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून नगर परिषदेला सहकार्य करावे. - तुषार बाबर, मुख्याधिकारी.