शहरी भागासह आजूबाजूच्या गावांमध्ये जलसंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:31 AM2021-05-09T04:31:54+5:302021-05-09T04:31:54+5:30
रत्नागिरी तालुक्यातील विविध भागांत पाणीपुरवठा करणाऱ्या काजळी नदीतील पाणीसाठा कमी झाल्याने पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य होत आहे़. ...
रत्नागिरी तालुक्यातील विविध भागांत पाणीपुरवठा करणाऱ्या काजळी नदीतील पाणीसाठा कमी झाल्याने पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य होत आहे़. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १५ मे २०२१ पासून २५ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे रत्नागिरी, मिरजोळे, झाडगाव औद्योगिक क्षेत्र तसेच रत्नागिरी नगर परिषदेचा काही भाग व नजीकच्या ग्रामपंचायती, मिरजोळे, शिरगाव, मिऱ्या, नाचणे, कुवारबांव, पोमेंडी, कर्ला, चिंद्रवली, टिके व इतर काही खासगी ग्राहकांना पाणीपुरवठा करण्यात येतो.
सद्य स्थितीमध्ये काजळी नदीतील पाणीसाठा अतिशय कमी झाला आहे़ त्यामुळे पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य होत आहे. सध्या पावसाचे आगमन अनिश्चित असल्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे नियोजन करून पाऊस चालू होईपर्यंत पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने महामंडळाने पाणीपुरवठा कालावधीमध्ये कपात करण्याचे धोरण ठरविले आहे. त्याचे गांभीर्य लोकांनी लक्षात घेऊनच पाण्याचा वापर काटकसरीने करावा. तसेच पाऊस लांबणीवर पडल्यास आणखी पाणी कपात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट सूचना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून देण्यात आल्याने नागरिकांना पाऊस सुरू होईपर्यंत पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
रत्नागिरी शहरवासीयांचे पाण्यासाठी हाल
रत्नागिरी नगर परिषदेकडून शीळ धरणातून शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो. शीळ धरणाकडून येणारी जलवाहिनी जुनी झाली आहे. त्यामुळे मुख्य जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटल्याने दररोज हजारो लिटर्स पाणी वाया जाते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून नगर परिषदेने ही जलवाहिनी बदल्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, हे काम सुरू झाल्यापासून शहरवासीयांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. अनेक भागातील लोकांना पाणी टँकरने विकत घ्यावे लागते. त्याचबरोबर या जलवाहिनीचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने त्याचा फटका शहरवासीयांना बसला आहे. त्यामुळे लोकांच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत असल्याने ते हैराण झाले आहेत.