रत्नागिरीत एमआयडीसीकडून पुन्हा पाणीकपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:11 AM2019-06-12T11:11:53+5:302019-06-12T11:13:06+5:30
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत रत्नागिरी, मिरजोळे, झाडगाव औद्योगिक क्षेत्र, रत्नागिरी नगरपरिषदेचा काही भाग व नजीकच्या ग्रामपंचायती मिरजोळे, शिरगाव, मिऱ्या, नाचणे, कुवारबाव, पोमेंडी, कर्ला, चिंद्रवली, टिके व इतर काही खासगी ग्राहकांना पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात तिसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे.
रत्नागिरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत रत्नागिरी, मिरजोळे, झाडगाव औद्योगिक क्षेत्र, रत्नागिरी नगरपरिषदेचा काही भाग व नजीकच्या ग्रामपंचायती मिरजोळे, शिरगाव, मिऱ्या, नाचणे, कुवारबाव, पोमेंडी, कर्ला, चिंद्रवली, टिके व इतर काही खासगी ग्राहकांना पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात तिसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे.
महामंडळाची पाणी साठ्याची क्षमता कमी असल्याने पाटबंधारे विभागाच्या शिपोशी येथील धरणातून पाणी घेण्यात आले. परंतु सध्या शिपोशी धरणातील पाणीसाठाही संपुष्टात आला आहे. महामंडळाच्या बंधाऱ्यातील पाणीसाठासुध्दा अल्प प्रमाणात आहे. त्यामुळे उपाय योजना म्हणून महामंडळाने यापूर्वी १३ मे २०१९ पासून पाणी पुरवठ्यामध्ये २५ टक्के कपात केली होती.
सध्याचा अल्प पाणीसाठा लक्षात घेऊन व पाऊस लांबणीवर जाण्याची शक्यता ओळखून महामंडळाकडून २ जून २०१९ पासून आणखी २५ टक्के पाणी कपात केली. धरणातील अल्प पाणीसाठा व पाऊस लांबणीवर जाण्याची शक्यता यामुळे ७ जूनपासून महामंडळाने धरणातील पाणीसाठा संपेपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण अवलंबले होते.
सद्यस्थितीत पाणीसाठा संपुष्टात येत असल्याने व पाऊस लांबणीवर जाण्याच्या शक्यतेमुळे १३ जून २०१९ पासून महामंडळ धरणातील पाणीसाठा संपेपर्यंत दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणार आहे. भविष्यात धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्यास महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा नाईलाजास्तव बंद होण्याची शक्यता आहे.