खेडमधील कोरोना सेंटरच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी; रुग्णांना सुरक्षितरित्या हलविले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 01:53 PM2021-07-22T13:53:22+5:302021-07-22T17:26:01+5:30
अतिमुसळधार पावसामुळे खेड शहरातील कोरोना सेंटरचा तळमजला पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे.
खेड: अतिमुसळधार पावसामुळे खेड शहरातील कोरोना सेंटरचा तळमजला पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे. या कोरोना सेंटरमधील ऑक्सिजन लावलेले ३५ रुग्ण बुधवारी रात्रीच कळंबणी रुग्णालयात हलवण्यात आले असून, ऑक्सिजन न लावलेले ४५ रुग्ण दुसऱ्या मजल्यावर आहेत. सर्व रुग्ण सुरक्षित आहेत. खेडमध्ये जगबुडी नदीच्या जुन्या पुलावरुन पाणी जात आहे.
बुधवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे खेड शहरात पूर आला आहे. रात्री पाण्याचे प्रमाण वाढू लागताच, व्यापारी आणि सर्व यंत्रणांनी धावपळ सुरू केली. खेड शहरातच शिवतेज आरोग्य संस्थेमध्ये शासकीय कोविड केअर सेंटर आहे. तेथे एकूण ८० रुग्ण होते. त्यातील ३५ जणांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे. हे रुग्ण तळमजल्यावर होते. पाणी वाढू लागताच या रुग्णांना तातडीने कळंबणी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. अन्य ४५ रुग्णांना रुग्णांना दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आले आहे.
सकाळपर्यंत पाणी वाढत जाऊन तळमजला पूर्ण पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या सर्वव रुग्णांना दुस-या मजल्यावर ठेवण्यात आले आहे. हे सर्व रुग्ण सुरक्षित आहेत. वैद्यकीय यंत्रणा त्यांच्यासोबत तेथेच आहे. त्यांच्या मदतीसाठी नगर परिषदेकडून एक बोट तैनात करण्यात आली आहे. गरजेच्या गोष्टी बोटीतून तेथे नेऊन दिल्या जात आहेत.