रत्नागिरी तालुक्यात चांदेराई, तोणदे येथे पाणी भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:20 AM2021-07-23T04:20:08+5:302021-07-23T04:20:08+5:30
रत्नागिरी : गुरूवारी ढगफुटीसदृश्य झालेल्या अतिवृष्टीचा फटका रत्नागिरी तालुक्यालाही जोरदार बसला आहे. या पावसाने काजळी नदीला पूर आल्याने चांदेराई, ...
रत्नागिरी : गुरूवारी ढगफुटीसदृश्य झालेल्या अतिवृष्टीचा फटका रत्नागिरी तालुक्यालाही जोरदार बसला आहे. या पावसाने काजळी नदीला पूर आल्याने चांदेराई, तोणदे या गावांमधील घरांमध्ये पाणी भरले. टेंभ्ये - बौद्धवाडी येथील आशा प्रदीप पवार (५५ वर्षे) या लस घेण्यासाठी जात असताना वाटेत असलेल्या पऱ्यात पाय घसरून पडल्या. त्यामुळे त्यांचा बूडून मृत्यू झाला. शहरानजिकच्या मिऱ्या येथील पंधरामाड येथेही भरतीचे पाणी घुसले.
तालुक्यात बुधवारी रात्रीपासून अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही चांदेराई गावाला पुराचा फटका बसला आहे. साखरपा भागात मुसळधार वृष्टी झाल्याने काजळी नदीला पूर आला. यामुळे रात्रीच्या सुमारास चांदेराई बाजारपेठ पाण्याखाली गेली. रात्रीच्या वेळेस पाणी भरल्याने या बाजारपेठेतील सुमारे १०० दुकानदारांची तारांबळ उडाली आहे. या गावातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. पाण्याची पातळी अजूनही वाढत असून, चांदेराई पुलावरून पाणी वाहू लागल्याने आता काही घरांमध्येदेखील पाणी शिरले आहे.
चांदेराईपाठोपाठ काजळी नदीच्या परिसरात असणाऱ्या अन्य गावांनादेखील पुराचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. साखरपा भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने काजळी नदीचे पाणी वाढत चालले आहे. याचा फटका आता तोणदे गावाला बसला असून, अनेक घरांमधून पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
टेंभ्ये - बौद्धवाडी येथील आशा पवार या सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस घेण्यासाठी जात होत्या. हातीस स्टॉप येथे येत असताना आडकरवाडी येथील दुथडी भरून वाहणाऱ्या पऱ्यामध्ये त्या पाय घसरून पडल्या आणि पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्या होत्या. त्यांचा मृतदेह जवळच असलेल्या झाडाला अडकलेल्या स्थितीत सापडला. पोलीस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तो बाहेर काढण्यात आला.
बुधवारी समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीने शहरानजिकच्या पंधरामाड-कांबळेवाडी परिसरातील सुमारे पंधरा फुटापेक्षा जास्त किनारा समुद्राने गिळंकृत केला आहे. यामुळे या पावसाळ्यातदेखील मिऱ्यावासीयांची भीती कायम आहे. किनाऱ्यालगतचा रस्ता देखील वाहून जाण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. यावर तत्काळ उपाययोजना न केल्यास येथील ग्रामस्थांना समुद्रापासून धोका निर्माण होणार आहे.