लांजात पावसामुळे साटवली बाजारपेठेत पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:20 AM2021-07-23T04:20:13+5:302021-07-23T04:20:13+5:30
लांजा : गेले तीन दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी रात्री वाढल्याने गुरुवारी सकाळी तालुक्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. ...
लांजा : गेले तीन दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी रात्री वाढल्याने गुरुवारी सकाळी तालुक्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. मुंबई - गोवा महामार्गावरील आंजणारी पुलावर तसेच वाटूळ - भांबेड - साखरपा मार्गावरील विलवडे येथे पुलावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. हर्दखळे रस्त्यावर दरड आल्याने वाहतूक ठप्प झाली हाेती. वादळी वाऱ्याने घरे व गोठ्यांचे नुकसान झाले आहे. साटवली बाजारपेठेत नदीचे पाणी शिरल्याने सात ते आठ घरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता.
तालुक्यातील काजळी नदीचे पाणी मुंबई - गोवा महामार्गावरील आंजणारी पुलाच्या कमानीजवळून वाहू लागल्याने या पुलावरील वाहतूक सकाळी बंद करण्यात आली हाेती. त्यामुळे आंजणारी ते मठ तसेच कुर्णे, वेरळ, देवधेपर्यंत गाड्यांच्या लांबच - लांब रांगा लागल्या होत्या. मुंबईकडे जाणारा मार्गच बंद झाल्याने वाहनचालक, प्रवासी अर्ध्यावरच अडकून पडले हाेते. आंजणारी येथील दत्त मंदिरही पुराच्या पाण्याखाली गेले आहे. मुचकुंदी नदीला पूर आल्याने वाटूळ - दाभोळे मार्गावरील विलवडे येथील पुलावर पाणी आले हाेते. त्यामुळे हा मार्गही बंद ठेवण्यात आला आहे. या नदीच्या पुराचे पाणी अकबर आलीम यांच्या घरामध्ये शिरले होते.
बेनी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्याने साटवली बाजारपेठेतील घरांमध्ये पाणी शिरले होते. तसेच शहरातील हॅपी पंजाबी धाबा, धनावडे यांच्या शेतातही पाणी शिरले होते. मुचकुंदी नदीच्या पुराचे पाणी वेरवली कोंड येथील घरांमध्ये घुसण्यास सुरुवात झाली होती. भांबेड पुराचे पाणी शेतात घुसल्याने भातशेतीचे नुकसान झाले आहे.
हर्दखळे रस्त्यावर दरड आल्याने हर्दखळे रस्त्याची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पावसामुळे तालुक्यातील इसवली - बोल्येवाडी येथील सुरेश रघुनाथ हातसकर व जानकी जानू हातसकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून नुकसान झाले आहे. देवधे मणचेकरवाडी येथील मनोहर देऊ नेमण यांचा गोठा कोसळला आहे. खोरनिनको येथील वसंत बाबू कस्पले यांचा गोठा कोसळला आहे. बेनी बु. येथील राजेंद्र मुकुंद सुर्वे यांच्या घरावर झाड कोसळले आहे. विवली येथील पांडुरंग धाकटा भितळे यांच्या गोठ्यावर झाड पडले आहे. आंजणारी व साटवली येथे लांजाचे प्रांताधिकारी पोपट ओमासे, तहसीलदार समाधान गायकवाड, गटविकास अधिकारी यशवंत भांड, पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील तसेच साटवली तलाठी जे. टी. भालेकर, मंडल अधिकारी आर. एम. विलणकर, भांबेड तलाठी एस. आर. हांदे, विलवडे तलाठी आर. ए. मळवीकर यांनी भेट देऊन पाहणी केली.